Loksabha2019 : दरोडेखोर, खोटारड्या चौकीदाराला घरी बसवा : ममता बॅनर्जी

पीटीआय
सोमवार, 8 एप्रिल 2019

नोटाबंदीच्या माध्यमातून लोकांच्या पैशाची लूटमार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरोडेखोर आणि खोटारडे चौकीदार आहेत

कोलकता (पीटीआय) : नोटाबंदीच्या माध्यमातून लोकांच्या पैशाची लूटमार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरोडेखोर आणि खोटारडे चौकीदार आहेत, त्यांना सत्तेतून खाली खेचा, अशा तिखट शब्दांत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोदींवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या नावाचे चित्रपट, मालिका काढण्याच्या मोदींच्या प्रयत्नांवरही बॅनर्जी यांनी टीका केली.

मोदी हे स्वतःला महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा मोठा नेता समजत आहेत, असे टीकास्त्र बॅनर्जी यांनी डागले. पश्‍चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात रविवारी झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या प्रचार सभेत बॅनर्जी बोलत होत्या. बॅनर्जी म्हणाल्या, ""नोटाबंदीच्या नावाखाली सार्वजनिक पैशांची मोदींनी लूटमार केली असून, आता निवडणुकीच्या तोंडावर आपण चौकीदार आहोत, असा ते अभिनय करीत आहेत. हा चौकीदार दरोडेखोर आणि खोटे बोलणारा आहे. सार्वजनिक पैशाचा वापर ते निवडणुकीसाठी करीत आहेत. देशाला लुटल्यानंतर शेतकऱ्यांना एक हजार, दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन देताना त्यांना लाज वाटायला हवी.''  या वेळी बॅनर्जी यांनी "चौकीदार लुटेरा है' अशी घोषणा दिली. पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या सभांमध्ये मोदी यांनी बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यास बॅनर्जी यांनी आज प्रत्युत्तर दिले. 

माझ्या आयुष्यात मी असा खोटे बोलणारा पंतप्रधान पाहिला नव्हता. मला धमकावण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा ती तुमची सर्वांत मोठी चूक असेल. 
- ममता बॅनर्जी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री 

Web Title: Mamta Banerjee criticize PM Narendra Modi in kolkata