Loksabha 2019: 'सप-बसपविरोधात भाजप-कॉंग्रेस एकत्र'

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मे 2019

कॉंग्रेस आणि भाजप यांचा अंतर्गत समझोता झाला आहे. उत्तर प्रदेशात हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाविरोधात लढत आहेत, अशी टीका "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती यांनी गुरुवारी कॉंग्रेसवर केली. 

लखनौ: "कॉंग्रेस आणि भाजप यांचा अंतर्गत समझोता झाला आहे. उत्तर प्रदेशात हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाविरोधात लढत आहेत, अशी टीका "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती यांनी गुरुवारी कॉंग्रेसवर केली. 

भाजपचा उमेदवार जिंकला तर कॉंग्रेसला काही फरक पडत नाही; पण "सप-बसप' उमेदवार विजयी होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. भाजपप्रमाणेच कॉंग्रेस "सप-बसप'बद्दल निरर्थक चर्चा करू लागली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य झाले असून, ते आमच्या आघाडीच्या विरोधात एकत्रपणे उभे राहिले आहेत, अशी टीका मायावती यांनी केली. 

यापूर्वी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बाराबंकी येथील प्रचारसभेत काल मायावती आणि सप'चे अध्यक्ष अखिलेश यादव यांना लक्ष्य केले होते. मायावती आणि अखिलेश यांचे नियंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे, अशी टीका त्यांनी केली होती. 

मायावती म्हणाल्या की, बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात जयंतीदिवशी "बसप'चा जन्म झाला आहे. कॉंग्रेसप्रमाणे भाजपने नकली आंबेडकरवादी बनण्याचा प्रयत्न करू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayawati slams both BJP & Congress