Loksabha 2019: अखिलेश म्हणतात, 'आता पुढची तयारी'

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मे 2019

- सप-बसपच्या आशा पल्लवित 
- कल चाचण्यांमधील यशाच्या अंदाजानंतर पक्षप्रमुखांमध्ये चर्चा 

लखनौ : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडीला मोठे यश मिळण्याचा अंदाज कल चाचण्यांमध्ये व्यक्त झाल्यानंतर या आघाडीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी डावपेच आखण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भेट घेतली. अखिलेश यादव यांनी मायवती यांची भेट घेतल्यावर म्हटले आहे की, आता पुढच्या तयारीला लागण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आज बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सप, बसप आणि राष्ट्रीय लोक दलाने एकत्र येत महाआघाडी केली होती. विविध कल चाचण्यांमध्ये या महाआघाडीला राज्यातील एकूण 80 जागांपैकी 30 ते 50 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. गेल्या निवडणुकीत भाजप आघाडीने येथे 73 जागा मिळवीत सर्वांनाच धूळ चारली होती. यंदा भाजप आघाडीला इतर सर्व राज्यांमध्ये यश मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला असला, तरी या सर्वांत महत्त्वाच्या राज्यात त्यांच्या जागा कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर अखिलेश यादव यांनी आज मायावती यांच्या निवासस्थानी जात त्यांच्याशी तासभर चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. 

तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात असलेले तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीही शनिवारीच (ता. 18) अखिलेश आणि मायावती यांची भेट घेत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास त्या स्थितीत विरोधकांनी एकत्र येत सत्ता स्थापण्याबाबत चर्चा केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prepping For Next Step, Says Akhilesh Yadav After Meeting Mayawati