Loksabha 2019: विरोधक तोंडावर आपटतील मोदींनी व्यक्त केला निवडणुकीचा अंदाज

वृत्तसंस्था
Monday, 13 May 2019

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात पोचला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा मोठा पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 
 

कुशीनगर/देवरिया (उत्तर प्रदेश) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात पोचला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा मोठा पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

"या निवडणुकीत विरोधक तोंडावर आपटतील. जनता कार्यक्षम आणि प्रामाणिक सरकारसाठी मतदान करत आहे. अखिलेश यादव आणि मायावती यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या एकत्रित कार्यकाळाहून अधिक काळ मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मात्र, माझ्या अंगावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. आता हेच लोक माझी जात विचारत आहेत. मी कधीही जातीचे राजकारण केले नाही. मी अतिमागास जातीत जन्मलो असलो तरी देशाला सर्वांत पुढे नेण्याचे माझे स्वप्न आहे. गरीब हीच माझी जात आहे, तीच माझी ओळख आहे,' असे मोदी येथील सभांमध्ये म्हणाले. मला मिळालेल्या पदांचा गैरवापर करून मी कधीही माझ्या कुटुंबाला श्रीमंत केले नाही. कारण, ही पदे जनतेची सेवा करण्यासाठीच आहेत, यावर माझा ठाम विश्‍वास आहे, असेही मोदी म्हणाले. 

2014 ला सत्तेत आल्यापासून दर दोन ते तीन दिवसांआड दहशतवादी मारले जात आहेत. सर्व प्रकारची सफाई हेच माझे काम आहे, असे सांगत मोदींनी जनतेला भाजपलाच मतदान करण्याची विनंती केली. 

"नक्राश्रू ढाळू नका; पाठिंबा काढा' 
राजस्थानमधील अलवार जिल्ह्यात दलित युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मोदींनी कॉंग्रेस आणि बसप पक्षांवर टीका केली. या दुर्दैवी घटनेचे दु:ख व्यक्त करताना बसप प्रमुख मायावती नक्राश्रू ढाळत असून, त्यांना खरोखरीच वाईट वाटत असेल तर त्यांनी राजस्थानमध्ये कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी मायावतींना केले. निवडणुकीत तोटा होऊ नये म्हणून राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने हे प्रकरण दाबून ठेवल्याचा आरोप करताना मोदी यांनी एकमेकांवर सातत्याने टीका करणारे सप-बसप-कॉंग्रेस हे राजस्थानात एकत्र आहेत, हीच मोठी महामिलावट आहे, अशी टीका केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi expressed his views on the Opposition