Loksabha 2019 : 'प्रियांका गांधी नवऱ्यापेक्षा करतात माझ्याच नावाचा जास्त जप'

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मे 2019

प्रियांका गांधी यांना पाच वर्षांपूर्वी माझे नाव सुद्धा माहित नव्हते. परंतु, आता त्या सातत्याने माझ्या नावाचा जप करत आहेत.

अमेठीः काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पाच वर्षापुर्वी माझे नावही माहित नव्हते. परंतु, आता त्या नवऱयापेक्षा माझ्याच नावाचा जप करत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि अमेठीतील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियांका गांधींना टोला लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना इराणी म्हणाल्या, 'प्रियांका गांधी यांना पाच वर्षांपूर्वी माझे नाव सुद्धा माहित नव्हते. परंतु, आता त्या सातत्याने माझ्या नावाचा जप करत आहेत. प्रियांका गांधी या सध्या आपल्या पतीचे नाव कमी आणि माझेच नाव जास्त उच्चारत आहेत. यावरुनच माझा अमेठीतला प्रचार यशस्वी झाला असल्याचीच ही पावती आहे.'

'अमेठीमध्ये राहुल गांधी यांची ओळख सांगण्यासाठी पुर्ण नाव घ्यावे लागते. मात्र, मला फक्त दिदी या नावाने ओळखतात. यावरूनच माझे आणि येथील मतदारांमध्ये किती जवळचे नाते आहे, हे दिसून येते,' असेही इराणी म्हणाल्या. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे धर्म आणि जातीच्या नावावर अमेठी मतदारसंघात राजकारण करत असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, की अमेठीच्या बेपत्ता खासदाराने विकास तर काही केला नाही, मात्र समाजात फूट पाडण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून अमेठीवर अन्याय करणाऱ्या राहुल यांनी लोकांत धर्म आणि जातीच्या नावावर भांडणं लावून दिली. काँग्रेसने नोट घ्या, व्होट द्या, असे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र यंदाची निवडणूक ही अमेठीला स्वातंत्र्य देणारी ठरेल. जनतेला राहुल गांधी यांचे धोरण कळून चुकले आहे आणि या वेळी बेपत्ता खासदाराला निरोप देणे निश्‍चित झाले आहे. गेल्या पाच दशकांपासून या ठिकाणी नामदार मंडळींनी राज्य केले. मात्र लोकांना प्यायला पाणी नाही, अशी या मतदारसंघाची स्थिती आहे, असेही इराणी म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Gandhi Now Takes My Name More Than Her Husbands says Smriti Irani