Loksabha 2019 : 'बोलो ता रा रा रा', दलेर मेहंदी यांचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
Friday, 26 April 2019

एक्कावन्न वर्षीय दलेर मेहंदी यांच्या उमेदवारीबाबत पक्षाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली : अभिनेते सनी देओल यांच्यानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिल्ली कार्यालयात दलेर मेहंदी यांचा पक्षप्रवेश पार पडला.

दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्यासह उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजप उमेदवार हंसराज हंस, केंद्रीय मंत्री आणि चांदणी चौकचे उमेदवार हर्षवर्धन तसेच पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

हंसराज हंस काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पक्षाने त्यांना उत्तर पश्चिम दिल्ली मतदार संघातून उमेदवारी दिली. दलेर मेहंदी हे हंसराज हंस यांचे नातेवाईक आहेत. हंसराज हंस यांचा मुलगा नवराज हंस आणि दलेर मेहंदी यांची मुलगी अवजीत कौर यांचा 2017 मध्ये विवाह झाला आहे. 1995 साली आलेल्या 'बोलो ता रा रा' अल्बममुले दलेर मेहंदी प्रकाशझोतात आले होते.

एक्कावन्न वर्षीय दलेर मेहंदी यांच्या उमेदवारीबाबत पक्षाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दलेर मेहंदी यांनी 2013 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पुढे पक्षासाठी त्यांनी गितांची रचना केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjabi singer Daler Mehndi joins BJP