Loksabha 2019 : शत्रुघ्न सिन्हांची पत्नी सपकडून निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या बड्या नेत्याशी झुंजणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- उत्तरप्रेदशातील लखनौ मतदारसंघात होणार हाय होल्टेज लढत
- समाजवादी पक्षाकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा यांना उमेदवारी 

लखनौ : समाजवादी पक्षाकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. लखनौ मतदारसंघातून भाजपकडून केंद्रिय मंत्री राजनाथसिंह हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे उत्तरप्रेदशातील लखनौ मतदारसंघात हाय होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

पूनम सिन्हा यांनी आज (ता.16) मंगळवारी पाटण्यात समाजवादी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. पूनम सिन्हा 18 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असे सांगण्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीतच ही उमेदवारी निश्चित झाली होती, असे सांगण्यात येत आहे. आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, काँग्रेसकडून लखनौ मतदारसंघात कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. काँग्रेसने जितीन प्रसाद यांना लढण्याचा आग्रह केला होता, परंतु जितीन यांनी नकार कळवला. यानंतर काँग्रेसने प्रमोद कृष्णम आणि हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी महाराज यांना आग्रह केला होता. परंतु त्यांनीही या लढतीसाठी नकार दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shatrughan Sinha's wife Poonam Sinha joins SP likely to stand against Rajnath Singh in Lucknow