Loksabha 2019 : वाजपेयी अजिंक्‍य होते, मात्र जिंकलो आम्ही : सोनिया गांधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

"भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनाही आपण अजिंक्‍य आहोत, असे वाटत होते. मात्र, 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि आमचा विजय झाला, हे विसरू नये,'' - सोनिया गांधी

रायबरेली (उत्तर प्रदेश) (पीटीआय) : "भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनाही आपण अजिंक्‍य आहोत, असे वाटत होते. मात्र, 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि आमचा विजय झाला, हे विसरू नये,'' अशा शब्दांत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे सुनावले.
 
सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रायबरेली मतदारसंघातून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला 2004 मधील पराभवाची आठवण करून दिली. पंतप्रधान मोदी अजिंक्‍य आहेत, असे आपल्याला वाटते का? या प्रश्‍नावर सोनिया गांधी यांनी "वाजपेयी अजिंक्‍य होते, पण विजय आम्हाला मिळाला,' असे उत्तर दिले.

अर्ज दाखल करण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यालयात पूजा व होम-हवन केले. त्या वेळी त्यांचे पुत्र व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, कन्या प्रियांका गांधी आणि जावई रॉबर्ट वद्रा उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी "रोड शो' केला.

सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनीही सोनियांचेच विचार पुन्हा मांडत "जे स्वतःला अजेय समजतात अशा लोकांना भारताने कायम दरवाजा दाखविला आहे, असे ते म्हणाले. "भारतीय इतिहासात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना ते अजिंक्‍य असल्याचा आणि भारतीय नागरिकांच्यापेक्षा मोठे असल्याचा ग्रह झालेला होता. नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत भारतातील जनतेसाठी काहीही केले नाही. निवडणूक निकालानंतर त्यांचा 'अजिंक्‍य'पणा पूर्णपणे दिसून येईल, 'अशी टीका त्यांनी या वेळी केली. 

'काय करायचे ते करा...' 
'राहुल गांधी यांना आपण तुरुंगात डांबू' या पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेबद्दल विचारले असता, "तुम्हाला काय पाहिजे ते करा. मी काहीही चुकीचे केलेले नाही. पण, अनिल अंबानी यांच्याशी तुमचे काय नाते आहे, मला सांगा. ते तुमचे भाऊ आहेत का मित्र किंवा अन्य कोणी? त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही विमान तयार केलेले नाही, मग त्यांच्या हाती रॅफेलचा सौदा कसा सोपविला,'' असा 
प्रतिप्रश्‍न राहुल यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi talks about Atal Bihari Vajpayee at Raibareli