Loksabha 2019 : 'सप'ने मोदींविरोधात दिली तेजबहादूर यादव यांना उमेदवारी

वृत्तसंस्था
Monday, 29 April 2019

समाजवादी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असल्यामुळे मोदी विरुद्ध तेजबहादूर यादव अशी लढाई होणार आहे.

वाराणसी: वाराणसी मतदारसंघातून समाजवादी पक्षाने आपला उमेदवार बदलला असून, सीमा सुरक्षा दलातील निलंबीत जवान तेजबहादूर यादव यांना उमेदवारी दिली आहे.

जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेजबहादूर यादव यांनी मोदी यांच्याविरोधात अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले होते. समाजवादी पक्षाने यापूर्वी वाराणसी मतदारसंघातून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, पक्षाने शालिनी यादव यांची उमेदवारी रद्द करुन जवान तेजबहादूर यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. समाजवादी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असल्यामुळे मोदी विरुद्ध तेजबहादूर यादव अशी लढाई होणार आहे.

तेजबहादूर यादव यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाला होता. त्यानंतर उमेदवारीसाठी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. दरम्यान, जवान यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तेजबहादूर यादव यांचा अर्ज पात्र ठरल्यानंतर 2 मे रोजी शेवटच्या दिवसापूर्वी शालिनी यादव आपला अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शंभरहून अधिक जवान हे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराला दुर्बळ करत असून, भष्टाचाराला खतपाणी घालत आहेत, असे या जवानांचे म्हणणे आहे. मोदींच्या विरोधातील हे सर्व जवान जेवणाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. या जवानांनी नरेंद्र मोदींना उमेदवारी अर्ज दाखल करताना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार केला होता. आपण एक खरे चौकीदार असून, खोट्या चौकीदाराविरोधात लढत आहोत, असे तेज बहादूर यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी आपण पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याचे सांगत मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. याप्रकरणी माजी लष्कर प्रमुखांसह अनेक निवृत्त जवानांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. आपले अधिकारी आणि भ्रष्टाचाराचा विरोध केल्याची किंमत आपल्याला चुकवावी लागत आहे, असे जवानांचे म्हणणे आहे. सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे. 2001 साली लष्करातून निवृत्त झालेले 62 वर्षीय ओम प्रकाश सिंह म्हणाले, 'सप्टेंबर 2016 मध्ये करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राइक पहिलीच नव्हती. मी स्वत: याआधी पाकिस्तानात जाऊन कऱण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा भाग राहिलो आहे.'

सीआरपीएफमधून निलंबित झालेले 32 वर्षीय पंकज मिश्रा म्हणाले, 'जवानांकडून जवळपास चार हजार तक्रारी आल्या आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांकडून आपल्या घरातील छोटी कामे करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचाही उल्लेख आहे. या सर्व तक्रारी गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात प्रलंबित आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SP fields former BSF jawan Tej Bahadur Yadav against PM Modi