Loksabha 2019 : पैसे दुसऱ्याचे घ्या, पण मत 'आप'लाच द्या: केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

दिल्ली येथे लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत. या जागांवर विजय मिळविण्यासाठी आप आणि काँग्रेस प्रयत्नशील आहेत.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूकीदरम्यान पैसे दुसरय़ाचे घ्या, पण मत मात्र आम आदमी पक्षालाच (आप) द्या, असे दिल्लीचे मुख्यमंत्री व 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान म्हणाले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दक्षिण दिल्लीतील 'आप'चे उमेदवार राघव चड्डा यांच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी (ता. 6) प्रचारसभा घेतली. भाजपचे नाव न घेता टीका करताना केजरीवाल म्हणाले, 'मतदानाच्या एक दिवस आधी मतदारांना राजकीय पक्षांकडून प्रलोभने दिली जातात. अन्य राजकीय पक्षांकडून तुम्हाला पैसे दिले जातील. तुम्ही पैसे घ्या पण तुमचे मत 'आप'लाच द्या. झाडू हे आम आदमी पक्षाचे निवडणुकीचे चिन्ह आहे.' केजरीवाल यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी राजकीय नेत्यांचा प्रचार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान मोदींवर गंभीर आरोप केले होते. शिवाय, भाजपकडून दावा करण्यात आला होता की, 'आप'चे सात आमदार आमच्या संपर्कात आहेत. तर भाजपकडून आमचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात आपचे तीन आमदारांनी भाजपची वाट धरली आहे.

दिल्ली येथे लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत. या जागांवर विजय मिळविण्यासाठी आप आणि काँग्रेस प्रयत्नशील आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपमध्ये आघाडीबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या मात्र आघाडी फिस्कटल्याने अखेर काँग्रेस आणि 'आप'ने स्वतंत्र्यपणे दिल्ली लोकसभा निवडणूक लढवत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take the money for others party but vote for AAP Says Arvind Kejariwal