Loksabha 2019 : ...तरच साध्वी प्रज्ञा यांचा प्रचार करूः भाजप नेत्या

वृत्तसंस्था
Friday, 26 April 2019

शिवराजसिंह यांचा मुस्लिमांशी चांगला संपर्क होता. शिवराजसिंह हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लिमांची माफी मागायला हवी.

भोपाळः मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजप नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. फातिमा म्हणाल्या, 'मी, साध्वी प्रज्ञा यांच्यासाठी प्रचार कऱणार नाही, त्यांनी धर्मयुद्धासंदर्भात विधान केले होते. 26/11च्या मुंबई हल्ल्यातील हुतात्मा हेमंत करकरे यांच्यासंदर्भातही त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. साध्वी प्रज्ञाच्या विधानांमुळे शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा मलिन झाली आहे. शिवराजसिंह यांचा मुस्लिमांशी चांगला संपर्क होता. शिवराजसिंह हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लिमांची माफी मागायला हवी. मुस्लिमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही. वादग्रस्त वक्तव्य करण्याऐवजी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला पाहिजे.'

दरम्यान, फातिमा यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का?, असा प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले. फातिमा या मध्यप्रदेशचे माजी मंत्री मरहूम रसूल अहमद सिद्दीकी यांच्या कन्या आहेत. फातिमा या भोपाळमधील भाजप नेत्या असून, विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत काँग्रेसच्या आरिफ अकील यांनी फातिमा यांचा पराभव केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wont campaign for sadhvi pragya till she apologises to muslims says bhopal bjp leader fatima siddique