Loksabha 2019 : 'या' गोष्टींसाठी भाजपला-शिवसेना युतीला पराभूत करा; सांगताहेत धनंजय मुंडे 

अनिल पाटील
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

धनंजय मुंडे यांनी भाजप-शिवसेना सरकारचा कारभार व नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

लोकसभा 2019
खोपोलि (जि. रायगड) : मावळ लोकसभा मतदार संघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ खोपोलीत आघाडीची भव्य प्रचार सभा गुरुवारी खोपोलीत संपन्न झाली. या सभेला विधान सभेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. सुनील तटकरे, आ. सुरेश लाड, जिल्हापरिषद अध्यक्ष अदिती तटकरे, नगराध्यक्षा सुमन औसरमल, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, रा. जि. प. चे शिक्षण तथा आरोग्य सभापती नरेश पाटील आदी नेते उपस्थित होते . 

या सभेत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे कसे चांगले व योग्य उमेदवार आहेत सांगताना, धनंजय मुंडे यांनी भाजप-शिवसेना सरकारचा कारभार व नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देश हुकूमशाही कडे वाटचाल करीत असून, मोदींचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर देशात लोकशाही संपुष्टात येईल व भारतीय इतिहासात ही शेवटची निवडणूक ठरले. त्यामुळे नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी हीच योग्य वेळ असून, मोदींची हुकूमशाही सत्ता संपुष्टात आणण्यासाठी व लोकशाही टिकवण्यासाठी भाजप-शिवसेनेचा पराभव करा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी खोपोलीतील मतदारांना केले. 

यावेळी मुंडे यांनी गेल्या पाच वर्षातल्या मोदी सरकारच्या कारभारावर चौफेर टीकास्त्र सोडले. अच्छे दिन, भ्रष्टाचार मुक्ती, चौकीदारी, रोजगार, महागाई अशा मुद्यांचा त्यांनी परामर्ष घेतला. मोदींची भाषा विजयाची नसून पराभवाची असल्याची टीका त्यांनी केली. विकासावर मत न मागता पुलगामामधील शहिदाच्या भांडवलावर मते मागणाऱ्या मोदींवर त्यांनी टीका केली. स्वतःवरची ईडीची पीडा टळावी म्हणून उध्दव ठाकरे यांनी अफजल खान म्हटलेल्या शहांची संगत धरल्याचा शेरा त्यांनी मारला. तसेच शिवसेनेची अवस्था नखे व दात काढलेल्या वाघासारखी झाल्याचे त्यांनी एका मार्मिक कथेतून विशद केली. यावेळी पार्थ पवार यांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.

राष्ट्रीय सरचिटणीस व आ. सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात दोन कोटी रोजगार देण्यात अपयश, शेतमालाला भाव देण्यात अपयश, महिलांवर अन्याय व अत्याचार, युतीतील बेबनाव, राम मंदिर बांधण्यात अपयश, फसवी कर्जमाफी ही नरेंद्र मोदींची कामगिरी  असल्याने जनताच त्यांना धडा शिकवेल हे सांगितले. शिवसेनेच्या लाचारीवर त्यांनी टीकास्त्र सोडले.
विद्यमान खासदारांच्या अकार्यक्षमतेवर त्यांनी प्रहार केले. खा. शरद पवार यांच्या कारखानदारीच्या हितासाठी केलेल्या कामांचा त्यांनी उल्लेख केला.  
आ. सुरेश लाड, नगराध्यक्ष सुमन औसरमल यांनीही यावेळी बोलतांना पार्थ पवार यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. सभेचे प्रास्ताविक जेष्ठ नेते उल्हासराव देशमुख तर सूत्रसंचालन दत्ताजीराव मसूरकर यांनी केले. या सभेला खोपोली व खालापुरातील राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप व आघाडीच्या मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defeat the alliance of shiv sena and bjp says Dhananjay Munde