रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात हवा ‘पालघर फॉर्म्युला’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

"पालघर लोकसभेची जागा भाजपने जशी सेनेला सोडली, तशी सेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला सोडावी. येथून सुरेश प्रभू चांगल्या फरकाने निवडून येतील"

रत्नागिरी - रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै आदी दिग्गज आणि विद्वत्ता असलेले खासदार होऊन गेले. त्या तोडीचे माजी खासदार सुरेश प्रभू आहेत. पालघर लोकसभेची जागा भाजपने जशी सेनेला सोडली, तशी सेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला सोडावी. येथून सुरेश प्रभू चांगल्या फरकाने निवडून येतील, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे, अशी गुगली भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी टाकली. 

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना-भाजपची युती जाहीर झाल्यानंतर समर्थनार्थ कमी आणि युती विरोधातील प्रतिक्रिया अधिक उमटू लागल्या आहेत. यापूर्वी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी आपली भावना व्यक्त केली होती. पाच वर्षांत खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या एकाही कार्यकर्त्यांचे काम केले नाही किंवा त्यांना निधी दिला नाही. आता कार्यकर्ते किती जवळ करतील हे येणारी वेळ ठरवेल, असे स्पष्ट केले होते. 

जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना याबाबत विचारल्यानंतर त्यांनी, तर युतीबाबत बाऊन्सरच टाकला.  ते म्हणाले, युती जाहीर झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतर आहे. गेल्या साडेचार वर्षांमध्ये वाद-वाद आणि वादच झाले. तरी पक्षादेश म्हणून आम्ही काम करायला तयार आहे. परंतु अजून त्याबाबत चर्चा करण्यासाठी स्थानिक आमदार किंवा अन्य कोणीही आलेले नाही. तीन मार्चला याबाबत संयुक्त बैठक होण्याची शक्‍यता आहे. या लोकसभा मतदारसंघाला मोठा 
वारसा आहे. 

सुरेश प्रभू यांची विद्वत्ता सर्वांनी पाहिली आहे. ऊर्जामंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री, नद्याजोड प्रकल्प आणि आता हवाई उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल आदर आहे. परंतु पालघरची जागा भाजपने सेनेला दिली आहे. तशी ही जागा सेनेने भाजपला सोडावी. बाळ माने यांच्या या वक्तव्याने युतीतील दरी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

सुरेश प्रभू येथून मोठ्या फरकाने निवडून येणार याचा ठाम विश्‍वास आहे. पक्षश्रेष्ठींकडे याबाबत लवकरच चर्चा करणार आहे.
 - बाळ माने,
जिल्‍हाध्यक्ष, भाजप.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand of 'Palghar Formula in Ratnagiri - Sindhudurg Constituency