Loksabha 2019 : पोलिस अधिकाऱ्याला नीलेश राणेंची शिवीगाळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

रत्नागिरी - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश राणे यांच्यासह सोळा जणांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (ता. 9) रात्री हातखंबा येथे नाकाबंदीच्या वेळी वाहने अडवून तपासणी केल्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना अश्‍लील शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप यांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश प्रवीण इंगळे यांनी ही तक्रार दिली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस महासंचालक यांच्या आदेशाने हातखंबा येथील पोलिस व संयुक्त पथकाद्वारे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू होती. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार इंगळे काल रात्री जिल्हा गस्तीला होते. यादरम्यान हातखंबा येथील स्थिर सर्वेक्षण पथकाला त्यांनी भेट दिली. पथक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते.

तेव्हा नाकाबंदीत सहभागी होऊन त्यांनी वाहनांची तपासणी सुरू केली.
यादरम्यान तेथे नीलेश राणे 16 साथीदारांसह वाहनांचा ताफा घेऊन आले. त्यांच्या ताफ्यातील वाहने तपासणी करण्यासाठी थांबवली तेव्हा नीलेश राणे व त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील शिवीगाळ तसेच आरडाओरड केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्याची धमकी देऊन शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला. बेकायदेशीर जमाव करून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले, असे इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Police Officer Nilesh Rane Shabby Crime