Loksabha2019 : तळपत्या उन्हातही राजकीय कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा… शीतपेय पिऊन शरीराला देतात थंडावा

अमित गवळे  
मंगळवार, 9 एप्रिल 2019

तळपत्या उन्हाची पर्वा न करता प्रचाराला लागले आहेत. दरम्यान थोडी उसंत घेऊन शीतपेय, लस्सी, सरबत व ताक पिऊन शरीराला थंडावा देत आहेत.

पाली : तळपत्या उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे प्रचारासाठी काही दिवसच हातात आहेत. परिणामी राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते तळपत्या उन्हाची पर्वा न करता प्रचाराला लागले आहेत. दरम्यान थोडी उसंत घेऊन शीतपेय, लस्सी, सरबत व ताक पिऊन शरीराला थंडावा देत आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे तसेच युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात अटीतटीची लढाई आहे. परिणामी एक-एक मत दोघांसाठीही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे जनमताचा कोल आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते तळागाळात प्रचारासाठी उतरले आहेत. 

स्थानिक कार्यकर्त्यांनी तर तळपत्या उन्हात देखील मतदारसंघात घराघरात जाऊन प्रचार सुरु केला आहे. अशा उष्म्यात शरीराला थंडावा देण्यासाठी मग हे कार्यकर्ते आईस्क्रीम पार्लर, शितपेये व लस्सी आणि ताकाच्या दुकांनावर आवर्जून थांबतात व नंतर लगेच प्रचाराला लागत आहेत. आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उन्हाची भीती वाटत नाही. मात्र शरीराला गारवा मिळविण्यासाठी शीतपेये व लस्सी आवर्जून पितो आणि पुन्हा प्रचाराला लागतो असे आरिफ मणियार या कार्यकर्त्यांनी सकाळला सांगितले.

उन्हाची पर्वा नाही
गर्मी खूप वाढली आहे. वाढत्या उष्म्याचा त्रास जाणवत असला तरी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी उन्हाची पर्वा करत नाही. उन्हात फिरल्यामुळे भूक लागत नाही मात्र शरीराला थंडावा देण्यासाठी आणि तहान भागविण्यासाठी शीतपेये, लस्सी, आईस्क्रीम, लिंबूपाणी किंवा सरबत यांचा आधार घेतो. असे सुशील शिंदे या तरुण कार्यकर्त्यांनी सकाळला सांगितले

धंदा तेजीत
राजकीय कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे चेले चपाटे देखील फिरत असतात. मग तेही शीतपेये, आईस्क्रीम व सरबतांवर ताव मारतात. अशा वेळी शीतपेये, आईस्क्रीम व सरबत विक्रेत्यांचा धंदा देखील खूप होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Party workers do not lack in excitement even in extreme heat