Loksabha 2019 : कुणबी कार्ड ही गीतेंची नेहमीची युक्ती 

सिद्धेश परशेट्ये
गुरुवार, 14 मार्च 2019

गीते यांचे खेड तालुक्‍यातील तिसंगी हे मूळ गाव आहे. या ठिकाणी त्यांचे बालपणी वास्तव्य होते. तटकरे यांची खेड तालुक्‍यातील पोयनार ही सासूरवाडी. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे खेडशी नाते घट्ट आहे. 

खेड - रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. शिवसेनेकडून अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. कुणबी मताचा टक्का आणि दरवेळेप्रमाणे कुणबी समाजाचे कार्ड वापरून गीते यावेळी मतदारसंघात मतांची बेगमी करतील, तर सुनील तटकरे हे आपल्या कार्यकर्त्यांची फळी वापरून मतदारसंघात जोरदार बॅटिंग करण्याच्या तयारीत आहेत. 

दोन्ही बलाढ्य उमेदवारांच्या अटीतटीच्या लढतीमुळे रायगडची निवडणूक रंगदार होणार आहे. मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरवात केली आहे. प्रचारातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरवात केली आहे. गीते हे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार म्हणून मतदारसंघात सुपरिचित आहेत. गीतेंकडून भ्रष्टाचाऱ्याच्या हाती मतदारसंघ देऊ नका,असा नारा सुरू आहे.

मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी उत्तम आहे. राष्ट्रवादीची बांधणी तकलादू असली तरी पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. या वेळच्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादीची झालेली आघाडी तटकरे यांच्या पथ्थ्यावर पडू शकते.

खेड, दापोली व गुहागर या तालुक्‍यातून गेल्या तीन -चार वर्षांत सेनेची ताकद वाढली आहे. या दोन्ही मतदारसंघात वीस हजारांवर नवीन मतदार नोंदणी झाली आहे. गतवेळच्या निवडणुकीत गीते यांनी तटकरे यांचा अडीच हजारांच्या मताधिक्‍याने पराभव केला होता. त्यामुळे यावेळची निवडणूक गीतेंसाठी सोपी नाही.

गीते हे स्वच्छ प्रतिमेचे असले तरी मतदारसंघात त्यांचे फारसे काम दिसून येत नाही. तब्बल सहा वेळा लोकसभेवर निवडून जाऊन दोन वेळा केंद्रातील मंत्रिपदी विराजमान होऊनसुद्धा गीतेंचा मतदारसंघावर प्रभाव खूपच कमी आहे. परंतु या दोन्ही उमेदवारांची खेड तालुक्‍याशी नाळ घट्ट आहे. गीते यांचे खेड तालुक्‍यातील तिसंगी हे मूळ गाव आहे. या ठिकाणी त्यांचे बालपणी वास्तव्य होते. तटकरे यांची खेड तालुक्‍यातील पोयनार ही सासूरवाडी. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे खेडशी नाते घट्ट आहे. 

सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध 
तटकरे यांचा खेडमधील जनसंपर्क चांगला आहे. तालुक्‍यातील सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. या निवडणुकीत शेकापशी राष्ट्रवादीने मैत्री केल्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होईल, तर युती झाल्याने भाजपचे मताधिक्‍य ही सेनेची जमेची बाजू राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत गीतेंचे सर्वस्व पणाला लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Lok Sabha Constituency Khed taluka special report