Loksabha 2019 : भाजप-शिवसेना दोघेही सत्तेसाठी लाचार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

- भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोघेही सत्तेसाठी लाचार
- सत्ता मिळवण्यासाठीच त्यांनी पुन्हा युती केली
- राज ठाकरे यांनी आज महाडमधून मोदी आणि शहांवर टीका
- नांदेड, सोलापूर, सातारा, पुण्यानंतर आज राज यांची महाडमध्ये सभा

महाड: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोघेही सत्तेसाठी लाचार असून सत्ता मिळवण्यासाठीच त्यांनी पुन्हा युती केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी आज कोकणातल्या महाडमधून पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. नांदेड, सोलापूर, सातारा, पुण्यानंतर आज त्यांची महाडमध्ये सभा झाली.

राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावात खूप वाईट परिस्थिती आहे. काहीही काम झालेलं नाही. नाल्याची व्यवस्था नाही. लोकांना चिखलातून जावे लागते. साठ वर्षात पंडित नेहरु, इंदिरा गांधीनी काही केलं नसतं तर, आपल्याला आता जे काही दिसत आहे ते कोठून आले. मोदींच्या खोटं बोलण्याला मर्यादा नसल्याचेही राज यांनी म्हटले. एका आठवडयात साडेआठ लाख संडास बांधले. मिनिटाला 34 संडास बांधले. सेकंदाला सात संडास बांधले. इतक्या लवकर संडास कसे बांधू शकतात असा प्रश्नही राज यांनी यावेळी उपस्थित केला.

नोटबंदी फसली, 99.03 टक्के पैसे परत आले. नोटबंदीपूर्वी जेवढी रक्कम फिरत होती, त्यापेक्षा जास्त रक्कम आता फिरत आहे. नोटबंदी आज पूर्णपणे फसली आहे. नोटबंदीचा निर्णय घेताना आरबीआय गव्हर्नर, सरकार, अर्थमंत्र्यांना माहिती नव्हती. नरेंद्र मोदींना नोटबंदीचा झटका आला आणि रांगेत उभं राहून लोकांचा जीव गेला. निवडणुकीत भाजप हजारो कोटी रुपये वाटत आहेत. हे पैसे कुठून आले तुमच्याकडे? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

मोदी-शहा दोन माणसंच देश चालवतात. मेक इन इंडियाचं काय झालं? कॅप्टन अमोल यादव यांना 35 हजार कोटी रुपये प्रकल्पात गुंतवणार म्हणून महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिलं. आज तेच कॅप्टन अमोल यादव अमेरिकन कंपनीबरोबर करार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोकण केरळपेक्षा पुढे आहे. आमदार परदेश दौरे करुन आले कोकणात काय बदल झाला? असाही प्रश्नही राज यांनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj thackerays rally in mahad against PM modi and amit shah