Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पालीत भाजपला मोठा हादरा

अमित गवळे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

  • जिल्हा नेतृत्वावर नाराज जिल्हा सरचिटणीस सुनिल दांडेकर यांचा राजीनामा
  • सुनिल दांडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिली पसंती असल्याचे चिन्ह

लोकसभा 2019
पाली (जि. रायगड) : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला आहे. पालीतील भाजप रायगड जिल्हा सरचिटणिस सुनिल दांडेकर यांनी मंगळवारी (ता.16) भाजपाच्या सदस्य व जिल्हा सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात सतत अपमानास्पद वागणूक मिळत असून पक्षात घुसमट होत असल्याने भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दांडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतीय जनता पार्टीत जिल्हा नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारची सन्मानपुर्वक वागणूक दिली जात नाही. तसेच जिल्हा सरचिटणीस हे पक्षातील दुसर्‍या क्रमांकाचे पद असून पदाला शोभेसे काम व जबाबदारी दिली जात नाही. लोकसभा निवडणुकीतही कोणतीच जबाबदारी दिलेली नाही. तसेच अन्य पक्षातून भाजपात आलेल्या उपर्‍या कार्यकर्त्यांना पक्षात मान दिला जातो. मात्र जुन्या व जेष्ठ कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचे सुनिल दांडेकर म्हणाले. पुढील राजकीय वाटचालीबाबत बुधवारी सहकार्‍यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनिल दांडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिली पसंती असल्याचे दिसते. 

या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. सुनिल दांडेकर मागील 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीत प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Dandekar resigned from the post of BJP Member and District General Secretary