Devendra-and-Raj
Devendra-and-Raj

Loksabha 2019 : साताऱ्यात राज, राजा आणि प्रजा!

सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात बुधवारी धडाडलेल्या तोफांनी राजकीय पारा वाढविला. देवेंद्र फडणवीसांनी ‘राजा विरुद्ध प्रजा’, असे लढतीला स्वरूप दिले; तर राज ठाकरेंच्या सभेने ‘राजेंना’ ‘मत’रंग चढविला. फडणवीसांनी सातारा काबीज करण्याचा विश्‍वास व्यक्‍त केला; तर ठाकरेंनी कथित जोडगोळीच्या ‘ठिकऱ्या’ पाडण्याचे काम केले. दोन दिग्गजांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रजा आणि राजाला ‘मतांचा तोफखाना’ देऊन राजकीय राजरंग आणखी गडद केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कोरेगावला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी साताऱ्यात सभा घेऊन राजकीय ज्वर वाढविला. दोघांनीही राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर बोलणे टाळले; पण फडणवीसांनी ‘राजा विरुद्ध प्रजा’ असा लढाईला रंग देऊन उदयनराजेंच्या विरोधात जनतेला चेतावले. 

दुसरीकडे राज ठाकरेंनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन, ज्याप्रमाणे औरंगजेबला महाराष्ट्रात गाडले, त्याप्रमाणे मोदी-शहा जोडीला गाडा,’ असे आवाहन करून अप्रत्यक्षपणे उदयनराजेंना ताकद दिली. बुधवारच्या सभेची गर्दी केवळ ‘मनसे’ आलेली दिसत नव्हती, त्यामागे ‘मनोमिलनसे’ ताकद असल्याचीही चर्चा होती. 

गत लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक करणारे शब्द आता याच निवडणुकीत मोदीविरोधी अस्त्र ठरले आहेत. एकही उमेदवार उभा नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी जाहीर सभांद्वारे सुरू केलेले ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम’ मोदींविरोधी जालीम औषध ठरणार का, हे महिनाभरात स्पष्ट होईल. सध्या तरी सभांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘मनसे’ला बळ देणारा ठरत आहे. ठाकरेंचा ठाकरी बाणा या लोकसभा निवडणुकीतील बहुतांश चर्चेचा मुद्द बनला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती सरकारविरोधी ‘लाज कशी वाटत नाही?’ या टॅगलाइनपेक्षा राज ठाकरेंची ‘लाव रे क्‍लिप’ हेच वाक्‍य चर्चेचे ठरले आहे. गत लोकसभा निवडणुकीत मोदींचे ‘लाँचिंग’ महाराष्ट्रात करण्याची किमया राज ठाकरेंनी केली. एवढेच नव्हे, तर ‘मनसे’च्या आमदारांना गुजरातचा विकास पाहण्यासाठी गुजरातला पाठविले. पण, या पाच वर्षांत राज ठाकरेंना नरेंद्र मोदी, अमित शहा ‘राष्ट्रीय आपत्ती’ वाटू लागले आहेत. कदाचित, पाच वर्षांतून पुलाखालून गेलेल्या पाण्याचा तो परिणाम असावा. साताऱ्यातील सभेत राज ठाकरेंनी तब्बल आठ मिनिटे थेट मोदींवर टीका केली. २० मिनिटे जवानांच्या अनुषंगाने मोदींच्या वक्‍तव्यांचा समाचार घेतला. मोदी विरोधी बाकावर असताना त्यांचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावरील आरोप, पंतप्रधानपदावर असतानाची आणि निवडणुकीच्या अनुषंगाची मोदींची भाषणासंबंधी व्हिडिओ, व्हिज्युअल्स हे अचूकपणे सादर करून त्याद्वारे केली जाणारी टिप्पणी राज ठाकरेंच्या सभेचे विशेष ठरले. 

दुसरीकडे फडणवीसांनी दुष्काळाचे पाप आघाडीच्या माथी फोडले. जिल्ह्याची स्थिती बदलण्यासाठी नरेंद्र पाटील यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहनही केले. राज ठाकरेंची लोकप्रिय वक्‍ते अशी ओळख असली तरी या तोफेचे मतांत रुपांतर होणे अनेकदा अयशस्वी ठरले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचीही भाषणशैली प्रभावी ठरणारी आहे. ठाकरेंच्या सभांमुळे मोदींच्या प्रतिमेविषयी लोकांमध्ये ‘स्पष्टता’ येत असली, तरी ही सभा मोदींविरोधी मते निर्माण करणार का? या दिग्गजांच्या सभा ‘राजा आणि प्रजा’ला बळ देणारी ठरणार का, हे निकालच सांगेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com