Loksabha 2019 : अशोक चव्हाण पुन्हा निवडणूक लढवणार; नांदेडमधून उमेदवारी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok_Chavan

Loksabha 2019 : अशोक चव्हाण पुन्हा निवडणूक लढवणार; नांदेडमधून उमेदवारी जाहीर

मुंबई : 'पक्षात माझे कुणीच ऐकत नाही' अशी 'खंत' व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने आज (शनिवार) रात्री उशीरा आठवी यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३८ उमेदवारांचा समावेश आहे. 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्गा येथून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्यासह दिग्विजयसिंह (भोपाळ), वीरप्पा मोईली (चिकबल्लापूर), हरीश रावत (नैनिताल) या प्रमुख उमेदवारांचीहू घोषणा करण्यात आली. आतापर्यंत आठ याद्यांमध्ये मिळून काँग्रेसने एकूण 218 उमेदवार जाहीर केले आहेत. 

'त्या' क्लिपमुळे चव्हाण दिवसभर चर्चेत! 
'पक्षात माझं कोणी ऐकत नाही. मलाही राजीनामा द्‌यावा वाटतोय, ' अशी अगतिकता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एका कार्यकर्त्यासोबत बोलताना व्यक्‍त केल्याची ऑडिओ क्‍लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर लोकसभेसाठी शिवसेनेतून कॉंग्रेसमधे आलेले आमदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी नाकारल्याने स्थानिक कार्यकर्ते संतापले आहेत. एका कार्यकर्त्यांने अशोक चव्हाण यांना या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्‍त करण्यासाठी दूरध्वनीवर संपर्क केला. त्यामधे त्याने धानोरकरांवर अन्याय झाल्याची व्यथा मांडली. 

यावर अशोक चव्हाण यांनी 'तुम्ही मुकूल वासनिक यांच्याशी संपर्क साधा. मला काहीही माहीत नाही. पक्षात माझे काही चालत नाही. कोणी ऐकत नाही. मलाच राजीनामा द्‌यावासा वाटतोय', असे विधान केले आहे. यामुळे आज कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्यामधे खळबळ उडाली.

loading image
go to top