Loksabha 2019 : 'लाज कशी वाटत नाही?'; काँग्रेस-राष्ट्रवादीची आक्रमक जाहिरात मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार अभियानाची आक्रमक मोहीम आजपासून सुरू झाली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार अभियानाची आक्रमक मोहीम आजपासून सुरू झाली. या जाहिरातीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील अपयशी कारभाराची माहिती जनतेसमोर मांडली जाणार आहे.

पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न करता पुन्हा मते मागायला येताना सरकारला ‘लाज कशी वाटत नाही’ या टॅगलाइनच्या माध्यमातून महाआघाडी सरकारला जनतेच्या मनातील प्रश्‍न विचारणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत महाआघाडीची एकत्रित प्रचार यंत्रणेची आणि प्रचारातील मुद्द्यांची माहिती, तसेच ऑडिओ, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर कशा पद्धतीने सरकारवर हल्लाबोल केला जाणार आहे याची माहिती सादरीकरणासह प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांनी दिली.

हुसेन दलवाई म्हणाले, की मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले असून, मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे गरीब, शेतकरी, कष्टकरी, तरुण, विद्यार्थी, छोटे व्यापारी, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी असे सर्वच समाज घटक अडचणीत आले आहेत. मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मते मागायला येण्याच्या आधी मागच्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले ते अगोदर सांगा, अशी जनतेची भावना आहे. सरकारने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन पाळले नाही; उलट तरुणांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला. नोकऱ्या मागणाऱ्यांना पकोडे तळायला सांगताना लाज कशी वाटत नाही, मुली पळवून नेण्याची भाषा करणाऱ्यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही, शाळा बंद करून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला पुन्हा मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही, असे दलवाई म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress NCP aggressive ad campaign for Loksabha election