Loksabha 2019 : नजरकैदेत ठेवलेल्या या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना 500 रुपये देण्याची इच्छा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 April 2019

अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुणास मुख्यमंत्र्यांच्या सभेत त्याने कुठलीही गडबड करु नये म्हणून पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे.

लोकसभा 2019
नाशिक : आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून, अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुणास कुठलीही गडबड करु नये म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून स्थानिक साध्या वेशातील पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे.

'मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने काढलेल्या अल्बमसाठी त्यांना 500 रुपये द्यायचे होते. मात्र पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचे' कृष्णा डोंगरेने सांगितले. येवल्याच्या नागरसुल येथील कृष्णा डोंगरे हा तरुण शेतकरी शेतमालाला भाव नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहे. सध्या त्याचे अर्धनग्न आंदोलन सुरु आहे. 2 दिवसांपूर्वी त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन जाहीर सभेत त्यांना निवेदन दिले होते. 

'कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पाच एकरात असलेले कांदे जाळून शासनाचा निषेध केला. मात्र कुठलीही दखल न घेतल्याने लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगात असलेला शर्ट, बनियन आणि पायातील चप्पलही मोदींना पाठवली. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत अर्धनग्न अवस्थेत राहून या शासनाच्या विरोधात लढा सुरु ठेवणार आहे,' अशी घोषणा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसुल येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी निफाड येथे शरद पवार यांच्यासमोर केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी पवारांना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The desire to give 500 rupees to the Chief Minister of a young farmer