Loksabha 2019 : ईव्हीएम हॅक न झाल्यास सर्व जागा जिंकू: प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

देशात एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल ही शक्यता धसूर आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही पण ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई: ईव्हीएम जर हॅक झाले नाही तर राज्यात आम्ही सर्व जागा जिंकू, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करताना ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे.

पत्रकाराशी बोलताना आंबेडकर म्हणाले, 'देशात एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल ही शक्यता धसूर आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही पण ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईव्हीएममध्ये काही गडबड झाली नसेल तर भाजप-शिवसेना युतीच्या जागा कमी होतील. सोलापूर, अकोला, सांगली, वर्धा, नागपूर, नाशिक अशा विविध मतदारसंघात चांगली लढत झाली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला निश्चित यश मिळेल. मुस्लिम मतदारांनी युती-आघाडी दोघांनाही नाकारले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यात अनेक जागा मिळतील. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दाखवले. यामध्ये बहुतांश एक्झिट पोलमधून देशातील मतदार पुन्हा एकदा मोदींना पसंती देत आहे, असे पाहायला मिळत आहे. एनडीएला 300च्या पुढे जागा मिळतील. काँग्रेस आणि विरोधी पक्षांना अपेक्षित असलेले यश मिळणार नाही.'

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत चर्चा सुरु आहे. एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र यावरुन विरोधकांनी ईव्हीएममध्ये गडबडी केल्याचा आरोप केल्याने देशातील वातावरण तापू लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If EVM is not hacked win all the seats in the state says Prakash Ambedkar