Loksabha 2019 : बारामतीच्या मुळावरच घाव घाला - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

लोकसभेची निवडणूक संपली, की पुरंदर विमानतळाचे काम प्राधान्याने मार्गी लावले जाईल. गेल्या वेळेस महादेव जानकर यांना कमळ चिन्ह न देण्याची चूक यंदा सुधारली आहे. कांचन कुल खासदार झाल्यास त्याचा हिशेब आपण पाच वर्षांनी येऊन देऊ.
 -  अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

बारामती - ‘बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे, अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत, हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. यंदाच्या लोकसभेची लढाई ही महत्त्वाची आहे. बारामतीच्या मुळावरच घाव घालायचा आहे. त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजयी करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी सहकार्य करा,’’ असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज बारामतीत केले.
शरद पवार व राहुल गांधी यांना लक्ष्य करीत अमित शहा यांनी आज बारामतीत जोरदार बॅटिंग केली. 

शहा म्हणाले, ‘‘काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सुरू असलेली देशातील घराणेशाही संपविण्याचे काम मोदी यांनी सुरू केले आहे. जे कुटुंबाचे भले करण्याच्या मागे आहेत; ते देशाचे भले करू शकणार नाहीत. त्यामुळे मोदींचे हात बळकट करा. त्यांनी गरिबी पाहिली व अनुभवली आहे. त्यामुळे तेच खऱ्या अर्थाने गरिबी दूर करू शकतात. पाच पिढ्या व ५५ वर्षे राजकारण करणाऱ्या गांधी 
परिवाराला गरिबी हटविणे जमणार नाही.’’ 

पवारांनी हिशेब द्यावा...
देशात ५० वर्षे सातत्याने सत्तेत व केंद्रात दहा वर्षे मंत्री असलेल्या शरद पवार यांनी बारामती, पुणे व राज्याचा काय विकास केला, हे सांगावे, असा सवाल करीत भाजप युवा मोर्चाचे युवक पवारांशी चौकात चर्चा करायला तयार आहेत. पवार हे कृषिमंत्री असताना कच्ची साखर आयात करीत होते. ती मोदींनी थांबविली. त्याचा ऊस उत्पादकांना फायदा झाला. त्यामुळे कारखानदारी बळकट झाली. आम्ही न मागताही पाच वर्षांचा हिशेब दिला आहे. शरद पवार आपण काय केले, याचा हिशेब द्यावा,’’ असे आवाहन शहा यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Baramati Constituency Amit Shah Politics