Loksabha 2019 : भाजपच्या महालाशेजारी ‘रासप’ ही झोपडी - जानकर

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 20 एप्रिल 2019

भाजप हा महाल असला, तरी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यामुळं भाजपनं आमच्या झोपडीचा आदर करावा. जमलंच तर झोपडी शेकरायला तणसाच्या पेंड्या द्याव्यात. त्यामुळंच मी कमळाच्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिला.

आमची भूमिका
भाजप हा महाल असला, तरी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यामुळं भाजपनं आमच्या झोपडीचा आदर करावा. जमलंच तर झोपडी शेकरायला तणसाच्या पेंड्या द्याव्यात. त्यामुळंच मी कमळाच्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिला. नाहीतर मला बारामती अथवा माढ्यातून उमेदवारी मिळत होती. पण, मला कमळाच्या चिन्हापेक्षा ‘कप-बशी’ चिन्हावर लढायचं होतं. त्यामुळं मी ठाम नकार दिला, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी सिद्धेश्‍वर डुकरे यांच्याशी बोलताना भूमिका मांडली. त्यांच्या मुलाखतीचा अंश -

प्रश्‍न - घटकपक्षांना भाजपने वाऱ्यावर सोडले. लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी का नाही दिली?
- हे बघा, वाऱ्यावर वगैरे सोडलेलं नाही. मी स्वाभिमानी आहे. मला उमेदवारी देत होते बारामती, माढ्यातून. पण, मला कमळाच्या चिन्हावर लढायचंच नव्हतं. कारण, माझाही पक्ष आहे. तो मला जिवंत ठेवायचाय. २०१४ मध्ये माझं दैवत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मला किती वेळा आग्रह करीत होते, तरीही मी बारामतीतनं कमळाच्या चिन्हावर लढलो का? नाही. मग आता कसा लढणार? 

प्रश्‍न - लोकसभेला संधी नाही; मग पुढे काय?
- लोकसभेला संधी नाही, असं नाही. आमच्या कांचनताई बारामतीतून भाजपच्या चिन्हावर लढत आहेतच की. आता राज्यापुरतं बोलायचं तर विधानसभेवर फोकस केलंय. याची वसुली करणार की भाजपकडून! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. माझ्या पक्षाला विधानसभेसाठी जागा देणार, असा त्यांनी शब्द दिलाय.

प्रश्‍न - विधानसभेला कशाच्या आधारावर जागा मागणार?
- म्हणजे, आमची ताकद नाही का? आमच्या पक्षानं आतापर्यंत तीन आमदार, शंभरावर नगर परिषद सदस्य, पंधराच्या आसपास सभापती मिळवलेत. हे कमी आहे का? पुढील काळात पक्षवाढीसाठी झंझावात सुरू करणार आहे.

प्रश्‍न - पक्षाने इतर राज्यांत उमेदवार उभे केलेत, खरे आहे का? त्यांच्या प्रचारासाठी जाणार का?
- उत्तर प्रदेशात आमच्या पक्षाकडून २२ जण, राजस्थानात नऊ, गुजरातमध्ये ११ जणांनी उमेदवारी केली आहे. कर्नाटकात पाच आणि तमिळनाडू व केरळात प्रत्येकी दोघे रिंगणात आहेत. ओडिशात एक माजी खासदार आमच्या पक्षाकडून लढताहेत, त्यांच्या प्रचारासाठी जाणार आहे.

प्रश्‍न - धनगर समाजासाठी सरकारने काय केले?
- धनगर समाजाला सरकारनं सवलती दिल्यात. समाजाच्या आदिवासी आरक्षणाबाबत प्रयत्न केलेत. महत्त्वाचं म्हणजे आदिवासी समाजबांधवांना मिळणाऱ्या सर्व सवलती धनगर समाजाला दिल्यात. फडणवीस सरकार धनगर समाजासाठी नक्‍कीच भरीव कार्य करणार आहे.

प्रश्‍न - भाजपला काय सांगणार आहात?
- भाजप हा महाल आणि राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यांनी झोपडीचा आदर ठेवावा. आमची ताकद पाहून विधानसभेला किमान १२ जागा मिळाव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 BJP RSP Mahadev Jankar Politics