Loksabha 2019 : इमानदार चौकीदार हवा की भ्रष्ट नामदार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

मोदी म्हणाले

  • शरद पवारांना झोप तरी कशी लागते?
  • काश्‍मिरी फुटीरतावाद्यांना काँग्रेसचे बळ
  • आघाडीच्या काळात सातत्याने बाँबस्फोट होत
  • दहशतवाद्यांच्या मनात चौकीदाराबाबत भीती
  • आता देश थेट कृती करू लागला आहे
  • सुराज्यासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करा
  • विकासासाठी आता काँग्रेसला हटवाच

नगर - तुम्हाला इमानदार चौकीदार हवा की भ्रष्टाचारी नामदार? आता तुम्हाला भारताचे नायक आणि पाकिस्तानचे समर्थक यातील एकाची निवड करावी लागेल.  देशाचे भविष्य काय असावे आणि देशाने कुठल्या दिशेने प्रगती करावी, हे या निवडणुकीत मतदारांनी ठरवायचे आहे असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला.

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व शिर्डीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान म्हणाले,
‘‘मोदी सरकारने पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या.

पिकांच्या हमी भावाचा संकल्पही पूर्ण केला. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी अनुदानाचे पैसे थेट त्यांच्या बॅंक खात्यांवर दिले. पुन्हा मोदी सरकार आल्यास पश्‍चिमवाहिनी नद्यांतून समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवू. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. या पाण्यामुळे दुष्काळ हटून शेती सुजलाम- सुफलाम होईल. याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापन करू,’’ असे ‘पाणीदार’ आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

‘शेतकरी या देशाची ताकद आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकार काम करते आहे. आमचे सरकार आल्यास आगामी काळातही हेच धोरण कायम ठेवले जाईल. अहल्याबाई होळकर यांनी लोकांसाठी ठिकठिकाणी विहिरी आणि बारव खोदले. त्यांचा वारसा आम्ही पुढे चालविणार आहोत. त्यासाठी पश्‍चिमवाहिनी नद्यांतून समुद्राला वाहून जाणारे पाणी अडविले जाईल. या पाण्यामुळे महाराष्ट्र सुजलाम- सुफलाम होईल. ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी इथेनॉल प्लॅंट स्थापन केले जातील. या उपपदार्थ निर्मितीतून साखर कारखानदारीलाही चांगले दिवस येतील,’’ असे मोदी म्हणाले. ‘‘शेतकऱ्यांनी गेल्या निवडणुकीत मोदी सरकारला दिलेले मत वाया गेलेले नाही. पीक हमी भावाचे आश्‍वासन आम्ही पाळले आहे. गरिबांना पक्की घरे मिळाली. त्यात वीज आली. शौचालये उभारली गेली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत गॅसजोडणी दिली. तुम्ही एका इमानदार माणसाला मत दिल्यानेच हे शक्‍य झाले,’’ असेही मोदी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना पेन्शन
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल प्रस्तावित असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘‘यापूर्वी पाच एकरांपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळाला. या वर्षी २३ मे नंतर त्यात बदल होऊन सर्वांनाच मदत देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्याशिवाय सर्वच शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर नियमित पेन्शन देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा विचारही कुणी केलेला नाही.’’

खासदार दिलीप गांधींचा ‘नाराजीनामा’
आपली उमेदवारी डॉ. सुजय विखे यांना दिल्याचा राग खासदार दिलीप गांधी आज लपवू शकले नाहीत. भाषण सुरू करताच त्यांनी आपण केलेल्या विकासकामांची जंत्री वाचायला सुरवात केली. त्यामुळे अस्वस्थ झालेले भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी त्यांना ‘थोडक्‍यात बोला’ अशी चिठ्ठी पाठवली. त्यामुळे गांधी एकदम संतापले. ‘मी बोलणार आहे दहा मिनिटे. अजून कोणी आले नाही,’ असे पुटपुटत त्यांनी ‘बोला तुम्हीच मग... असं काय करताय? दोन मिनिटं बोलू देणार नाही का... तुम्हीच बोला ना!’ असे म्हणत डायसपासून बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी माइक सुरू असल्याने सर्वांना ते स्पष्टपणे ऐकायला मिळाले. कशीबशी समजूत घातल्यानंतर ते पुन्हा बोलायला लागले. त्यांचा स्वर संतप्त आणि कातर होता. त्यावर कसाबसा ताबा मिळवत त्यांनी भाषण पूर्ण केले. त्यात त्यांनी डॉ. विखे यांचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे विखे-गांधी यांच्यातील राजकीय ‘पॅचिंग’ दिखाऊ असल्याची चर्चा रंगली होती.

खासदार दिलीप गांधी यांनी चांगले काम केले होते. यापुढेही त्यांच्या पाठीवर पक्षाचा कायम हात असेल; परंतु निवडणुकीत विरोधकांवर सर्जिकल स्ट्राइक करावा लागतो. त्यामुळे डॉ. सुजय विखे यांना भाजपमध्ये घेतले. डॉ. सुजय हे चांगले बॅट्‌समन आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: Loksabha Election 2019 Chowkidar Narendra Modi Speech Politics