Loksabha 2019 : शक्तिप्रदर्शन, मनधरणी, पदरात पाडून घेणे

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 16 मार्च 2019

काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रखडलेल्या जागांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, इतर छोट्या पक्षांनी दबावतंत्र वापरत चर्चेचा रतीब घातला. काहींच्या हाती लागले, तर काहींना प्रतीक्षा करावी लागत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रखडलेल्या जागांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, इतर छोट्या पक्षांनी दबावतंत्र वापरत चर्चेचा रतीब घातला. काहींच्या हाती लागले, तर काहींना प्रतीक्षा करावी लागत आहे.

शिवसेना-भाजपची युती झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जागा वाटपाचा कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. या चार प्रमुख पक्षांच्या युती-आघाडीच्या दावणीला राज्यातील छोटे-छोटे पक्ष जास्त वाटा मिळावा म्हणून हिसके घेताहेत. काहींना लोकसभेच्या जागा हव्यात. यापैकी काहींचा विधानसभेच्या जागांवर डोळा आहे; तर ‘आप’, ‘बसप’सारखे पक्ष ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहेत. वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबरचं चर्चेचं गुऱ्हाळ संपवून स्वबळाच्या बेटकुळ्या फुगवल्या आहेत.

आघाडीच्या फांदीवरील पक्ष
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं जागा वाटप आणि अदलाबदलीचं गुऱ्हाळ सुरू आहे. दोन्हीकडले दिग्गज चर्चेचा रतीब घालताहेत. काँग्रेसनं २६, तर राष्ट्रवादीनं २२ असं जागा वाटपाचे ढोबळ सूत्र सध्या चर्चेत आहे. घटक पक्षांना आपापल्या वाट्यातून जागा सोडाव्यात, असं ठरतंय. या आघाडीच्या फांदीवर शेतकरी कामगार पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, जनता दल धर्मनिरपेक्ष, आमदार कपिल पाटील यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल, पीपल रिपब्लिक पक्ष जोगेंद्र कवाडे गट, खोब्रागडे, गवई गट, संभाजी ब्रिगेड, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना इत्यादी पक्ष सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या फांदीवर आहेत. या सर्व पक्षांचे अजेंडे वेगळे आहेत. त्यांना आपलं अस्तित्व टिकवत काहीतरी पदरात पाडून घ्यायचंय. यातील बहुसंख्य पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत फारसा रस नाही. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका यामध्ये वाटा हवा आहे. तो पदरात पाडण्यासाठी राजकीय घासाघीस करण्यातील ताठरतेचा तडाखा या दोन पक्षांना भेडसावत आहे.

हातकणंगले ‘स्वाभिमानी’ला
स्वाभिमानी पक्षाने लोकसभेच्या हातकणंगले, बुलडाणा, अमरावती अशा तीन जागा मागितल्या होत्या. त्यात आता माढ्याची भर पडलीय. हातकणंगलेतून खुद्द राजू शेट्टी लढणार आहेत, तर बुलडाण्यात रविकांत तुपकर यांच्यासाठी शेट्टींनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला. त्यामुळं ‘स्वाभिमानी’नं आगपाखड करीत अल्टिमेटम दिला. अखेरीस शेट्टी यांना हातकणंगलेतून पाठिंब्याचे ठरले आहे. राष्ट्रवादीने तशी तयारी दाखवली आहे, तर काँग्रेस सांगलीची जागा सोडण्याचा विचार करत आहे. मात्र, त्या जागेचा घोळ सुरूच आहे. ‘स्वाभिमानी’प्रमाणेच दिंडोरीतून ‘माकप’ने जीवा पांडू (जे. पी.) गावीत यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित केलीय. काँग्रेस माकपला पालघरची जागा देऊ करतंय. मात्र ‘माकप’ला पालघर नकोय. यामुळं काँग्रेसची दमछाक होतेयं. संभाजी ब्रिगेडनं पुण्यात प्रवीण गायकवाड यांच्या नावासाठी आग्रह धरलायं. शरद पवार यांनी प्रयत्न करूनही काँग्रेसचा प्रतिसाद नाही. त्यामुळं संभाजी ब्रिगेडनं स्वबळावर १५ उमेदवार देण्याची घोषणा केली आहे; तर समाजवादी पक्षानं भिवंडीची जागा मागितली आहे. काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ने ‘सप’ला विधानसभेच्या जागा सोडण्याबाबत राजी झाले आहेत. मात्र, अद्याप समाजवादी पक्ष अडून आहे. मात्र तोडगा निघेल, अशी आशा काँग्रेसला आहे; तर राजेंद्र गवई हे अमरावतीची जागा मागताहेत. 

बाकीच्या घटक पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत रस नाही. जनता दल, जनता दल धर्मनिरपेक्ष, कवाडे, खोब्रागडे गट आदींना विधानसभा, विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात वाटा पाहिजे. त्यामुळं हे पक्ष सध्या सोबत आहेत. या घटक पक्षांची ठिकठिकाणी ताकद आहे, हे मात्र निश्‍चित.

बखर पक्षाची
शेकापची रायगड, अलिबाग, सांगोला, कोल्हापूरसह मावळ, रायगड, माढा या लोकसभा मतदारसंघात ताकद.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद हातकणंगले, माढा, बुलडाणा मतदारसंघात. शेट्टी हातकणंगलेचे सध्या प्रतिनिधित्व करतात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Congress NCP BJP Shivsena Politics