Loksabha 2019 : ‘जीएसटी’बाबत काँग्रेसचा दुटप्पीपणा - पीयूष गोयल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

छोट्या व्यापाऱ्यांना ‘जीएसटी’तून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखांची मर्यादा निश्‍चित केली होती. पण, काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० लाख एवढी झाली. ‘जीएसटी’बाबतचे निर्णय घेताना आतमध्ये एक आणि बाहेर दुसरी, अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसने घेतली.

पुणे - छोट्या व्यापाऱ्यांना ‘जीएसटी’तून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखांची मर्यादा निश्‍चित केली होती. पण, काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० लाख एवढी झाली. ‘जीएसटी’बाबतचे निर्णय घेताना आतमध्ये एक आणि बाहेर दुसरी, अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसने घेतली. त्यामुळे व्यापाऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही, अशी टीका केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली.

महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता.  गोयल म्हणाले, ‘‘गतीने बदल होत असताना त्याच्या त्रासाचे चटके सहन करावे लागतात. पण, हे बदल देश व जनतेच्या हिताचे आहेत, याचा विचार करावा. व्यापाऱ्यांना ज्या समस्या आज भेडसावत आहेत; त्याचे मूळ पूर्वीच्या पाच वर्षांपासूनच आहे. ‘जीएसटी’ कायदा, बॅंकिंग व्यवस्थेत बदल, ऑनलाइन कर भरण्याच्या पद्धतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला. ‘सब कुछ चलता है’ ही मानसिकता बदलण्याचा आम्ही प्रयत्न केला.

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे देशात गरिबी वाढली. त्यांना गरिबी हटवायचीच नसल्याने अनेक वर्षांपासून केवळ ‘गरिबी हटाव’चा ते नारा देत आहेत. देशाच्या विकासात व्यापाऱ्यांचे योगदान मोठे आहे. देशाचा विकास झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी व्यापाऱ्यांनी भाजपला पाठिंबा द्यावा.’

Web Title: Loksabha Election 2019 GST Congress Piyush Goyal Politics