Loksabha 2019 : शिवसेना, राष्ट्रवादीमध्येच सामना

मयूरी चव्हाण-काकडे
सोमवार, 22 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रमुख समस्या 

  • वालधुनी आणि उल्हास नदीचे प्रदूषण 
  • शेतकऱ्यांच्या जमिनींचे प्रश्न 
  • एमआयडीसी परिसरातील वाढते प्रदूषण 
  • पाचव्या, सहाव्या रेल्वेच्या मार्गिकेचे रखडलेले काम 
  • आरोग्य आणि पाणी समस्येचा गंभीर प्रश्न 
  • दिवा डम्पिंग ग्राउंडचा रखडलेला प्रश्न

आगरी कार्ड युती आणि आघाडीने वापरले आहे. उमेदवारी देतानापासून ती काळजी घेतल्याने चुरस निर्माण झाली आहे. ‘मनसे’ने आपले बळ आघाडीमागे उभे केल्याने लढत आणखी रंगतदार होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. पाटील यांच्या रूपात राष्ट्रवादीने आगरी कार्ड पुढे केलेय; त्याच वेळी शिवसेनेतही आगरी समाजातील नेत्यांची फळी मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने हे कार्ड कितपत यशस्वी होईल, याबाबत साशंकता आहे. त्यातच ‘मनसे’ने राष्ट्रवादीला पाठिंबा देत बैठकांना हजेरी लावून आघाडीची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

कल्याण मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून विशेष कोणी नेता या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नव्हता. अखेर आगरी समाजाचे वर्चस्व बघता बाबाजी पाटील यांच्याकडे उमेदवारी आली. बाबाजी पाटील यांचे वास्तव्य कल्याण ग्रामीणमध्ये असून, ते भूमिपुत्र असल्याने विशेषतः आगरी समाजाचा त्यांना पाठिंबा मिळेल, असा राष्ट्रवादीला विश्‍वास आहे. त्याचवेळी आगरी समाजातील आमदार सुभाष भोईर, रमेश म्हात्रे, पुंडलिक म्हात्रे, दीपेश म्हात्रे, रमाकांत मढवी, वामन म्हात्रे अशा पदाधिकाऱ्यांची फळी शिवसेनेत कार्यरत असल्याने हे आगरी कार्ड कितपत उपयोगी पडेल, याबाबत साशंकता आहे.

त्यातही ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडलेल्या बाबाजी पाटील यांचा कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राबाहेर विशेष संपर्क नसल्याने राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांवर त्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक त्यांच्या प्रचाराच्या व्यूहरचनेसाठी काही प्रमाणात मदत करीत असल्याने ती त्यांच्यासाठी जमेची बाब आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे हे सुशिक्षित, तरुण, अभ्यासू उमेदवार म्हणून परिचित आहेत. एकनाथ शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक श्रीकांत यांचे बलस्थान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Kalyan Constituency Shivsena NCP Fight Politics