Loksabha 2019 : नेत्यांचा हॉटेलखर्च रोज ४० हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

भाषणासाठी चार हजार
उमेदवाराला प्रचार फेरीचे व्हिडिओ चित्रीकरण करायचे असल्यास दररोज आठ तासांसाठी तीन हजार रुपये खर्च लावला जाईल. उमेदवाराला स्टुडिओत भाषणाचे ध्वनिमुद्रण करायचे असल्यास तेवढ्याच खर्चाची नोंद होईल. दोन ध्वनिक्षेपक (माइक), दोन ध्वनिवर्धक (लाउडस्पीकर) व एक ध्वनिवर्धक यंत्र (ॲम्प्लिफायर) अशा संचासाठी चार हजार रुपये खर्च ठरविण्यात आला आहे.

मुंबई - मुंबईतील निवडणूक प्रचारावर होणाऱ्या खर्चाचे दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केले असून, फलकाच्या (होर्डिंग) व्यावसायिक जागेचे १५ दिवसांचे भाडे दोन लाख रुपये ठरविण्यात आले आहे. राजकीय नेत्यांच्या पंचतारांकित हॉटेलातील एका दिवसाच्या मुक्‍कामासाठी ४० हजार रुपये खर्चाची नोंद केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे प्रचारसाहित्य, नेते-कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेवर होणाऱ्या लहान-मोठ्या खर्चाचे सरकारी दर साधारणतः बाहेरील दरांएवढेच ठेवण्यात आले आहेत. उमेदवारांना तपशीलवार खर्च विशिष्ट नमुन्यात निर्धारित वेळेत सादर करावा लागेल. भाड्याने घेतलेल्या तात्पुरत्या पक्ष कार्यालयासाठी चौरस फुटामागे दरमहा १८० रुपये दराने खर्चाची नोंद होईल. तेथे काम करणाऱ्या प्रतिनिधीला दिवसाला १०० रुपये दराने खानपान भत्ताही द्यावा लागेल. प्रशिक्षित व्यक्ती कामावर ठेवल्यास दरमहा आठ हजार रुपये आणि अप्रशिक्षित व्यक्तीला सहा हजार ५०० रुपये मेहनताना ठरविण्यात आला आहे. वाहनचालकाचा पगार दरमहा १५ हजार रुपये ठरविला आहे.

मोकळ्या जागेवरील सभेसाठी व्यासपीठ किंवा मंडप बांधण्याचा खर्च चौरस फुटाला ५० रुपये निश्‍चित करण्यात आला असून, जागेचे भाडे वेगळे असेल. कापडी व फ्लेक्‍सचे बॅनर, कापडी झेंडे व कटआउट यांचे दर १५ ते १८० रुपये प्रतिचौरस फूट आहेत. प्रवेशद्वार व कमानी बांधण्याचा खर्च चौरस फुटामागे ५० ते ५८ रुपये निर्धारित केला आहे. प्लॅस्टिक खुर्ची, घडीचे टेबल, सोफा, हॅलोजन दिवे, ट्यूबलाइट यांचे दर १५ ते १५० रुपयांपर्यंत आहेत. उमेदवार किती खर्च करतो, त्याचे किती कार्यकर्ते आहेत, त्यांना कोणत्या सुविधा मिळतात आदींची खातरजमा करण्यासाठी प्रशासनाचे व्हिडिओग्राफर चित्रण करणार आहेत.

प्रचार खर्च
 २ लाख (१५ दिवसांसाठी) होर्डिंगसाठी भाडे 
४० हजार (रोज) पंचतारांकित हॉटेल मुक्काम
८ हजार (दरमहा) प्रशिक्षित कर्मचाऱ्यासाठी
१५ हजार (दरमहा) वाहनचालकाचा मेहनताना
३ हजार (आठ तासांसाठी) प्रचार फेरीचे व्हिडिओ चित्रीकरण

Web Title: Loksabha Election 2019 Leader Hotel Expenditure Publicity