Loksabha 2019 : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

अभय दिवाणजी
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रश्‍न 

  • कृष्णा-भीमा स्थिरीकरण, सिंचनाचा प्रश्‍न, उजनीचे रखडलेले प्रकल्प
  • पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्ग, एमआयडीसीची गरज 
  • कृषिपूरक उद्योग, साखर कारखानदारीसमोरील आव्हाने
  • कुर्डुवाडी रेल्वे कारखान्यासाठीचे काम
  • शेती महामंडळाचे मळे पडीक, हजारो एकर शेती पडून, मजूर बेरोजगार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीवरून आरंभीच्या काळात गाजलेल्या, देशाच्या राजकीय पटलावर चर्चिल्या गेलेल्या माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात चुरशीचा सामना आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे मतदारसंघात मोठी राजकीय घुसळण झाली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलाय. थेट शरद पवार आणि भाजप नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.

फडणवीस यांनी भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी दिलेला प्रस्ताव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदेंनी नाकारला. दरम्यान, येथून हमखास निवडून येणारा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने शिंदेंच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली. माढा मतदारसंघातील लढाई उमेदवारी निश्‍चितीपासून ते प्रचार यंत्रणा राबविण्यापर्यंत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डावपेचातून होत आहे. या डावपेचात काँग्रेस-राष्ट्रवादीतील मंडळींना आपल्या गोटात ओढण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले, तर पवारांनी भाजपच्या गोटात जाऊ पाहणाऱ्या शिंदेंनाच उमेदवारी देऊन बाजी मारली. 

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह यांच्या विरोधात संजय शिंदे, आ. प्रशांत परिचारक, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, कल्याणराव काळे, शहाजीराव पाटील, जयकुमार गोरे, शेखर गोरे, उत्तम जानकर असे सर्व समविचारी एकत्र आले. मात्र यातील शिंदे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याने ते विरुद्ध उर्वरित समविचारी असे चित्र सध्या दिसत आहे. या मतदारसंघातील तिन्ही उमेदवार आपापल्या पक्षासाठी उपरेच आहेत. निंबाळकर सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष झाले होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली.

शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी करमाळा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. दोन्ही उमेदवार आपापल्या पातळीवर प्रचाराची रणनीती आखत एकमेकांवर शरसंधानाची संधी सोडत नसल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Madha Constituency Politics