Loksabha 2019 : मावळचे रणांगण तापण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेतर्फे उमेदवाराचे नाव लवकरच अधिकृतरीत्या जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेतर्फे उमेदवाराचे नाव लवकरच अधिकृतरीत्या जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाचे नेतेही या सभेला उपस्थित राहणार आहेत. शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे तसेच तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित राहतील. वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, जाहीर सभेच्या नियोजनासाठी आज कार्यकर्त्यांची बैठक झाली. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी करावयाच्या कामांबाबत सूचना देण्यात आल्या. 

जनसंपर्क करताना कोणते मुद्दे मांडायचे, त्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्या शहरातील प्रचारासंदर्भातील आखणी जाहीर सभेनंतर करण्यात येईल. 

सहाही विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली असून, भाजप व शिवसेनेच्या युतीनंतर दोन्ही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी (ता. १६) पनवेलला होणार आहे. तेथे उरण, कर्जत व पनवेल या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते जमणार आहेत; तर मावळ, पिंपरी व चिंचवड या विधानसभा मतदारसंघातील युतीच्या कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी (ता. १९) होणार आहे, अशी माहिती 
बारणे यांनी दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुण्यात सोमवारी (ता. १८) आहेत. त्याच दिवशी सायंकाळी कोकणातील मतदारसंघांबाबतची आढावा बैठक वाशी येथे होणार आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघांत केलेली कामे, केंद्रातील मोदी सरकारने केलेली विकासाची कामे यांची माहिती जनतेला देण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे.

भाजपचे कार्यकर्ते अद्यापही युतीच्या जागा वाटपात मावळ मतदारसंघ भाजपला मिळण्याबाबत आशा बाळगून आहेत. मात्र, ती शक्‍यता कमी असल्याचे मत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. त्यामुळे, शिवसेनेने उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतरच, भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Maval Parth Pawar Politics