Loksabha 2019 : मनसे आता ‘उनसे’ - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 एप्रिल 2019

भाजपने दिलेल्या ५४० आश्वासनांपैकी ५२० पूर्ण झाली आहेत; तर २० पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘फ्रस्टेड’ झाले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.

राज ठाकरे पूर्णपणे ‘फ्रस्टेड’ आहेत. मनसे आता ‘उनसे’ झाली आहे. ‘उनसे’ म्हणजे ‘उमेदवार नसलेली सेना’, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. ‘राज ठाकरे हे वाट चुकलेले नेते,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वर्णन केले.
विरोधकांना ब्लॅकमेल करण्यासाठी सर्व यंत्रणांना सरकार वापर करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे बडे नेते भाजपमध्ये असते. मनसे आता ‘उनसे’ म्हणजे ‘उमेदवार नसलेली सेना’ झाली आहे. शरद पवार हे राज्यात जातिभेदाचे विष पसरवीत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. मात्र, आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता, असे म्हणत फडणवीसांनी दबावतंत्राचा आरोप फेटाळून लावला.

जीएसटीमुळे सरकारी तिजोरीत पैसा आला. त्यामुळे तो सर्वसामान्य, शेतकरी यांच्यापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून पोहचविणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या खात्यात ७२ हजार कुठून येणार, हे राहुल गांधी सांगू शकले नाहीत. मात्र, भाजप जबाबदार पक्ष आहे. आम्ही सत्तेत येणारच आहोत. त्यामुळे शब्द देताना तरतूद करावीच लागेल. ‘संवेदनशील पंतप्रधानाने समाजाची गरज ओळखून केलेले संवेदनशील घोषणापत्र,’ अशा शब्दांत फडणवीसांनी भाजपच्या ‘संकल्पपत्रा’चे वर्णन केले. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोललेच नव्हते, कोणतीही व्हिडिओ क्‍लिप किंवा भाजपचे ‘संकल्पपत्र’ काढून बघा, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 MNS Politics Devendra Fadnavis