Loksabha 2019 : मोदींमुळेच एफआरपीची रक्‍कम देणे शक्‍य - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

अकलूज येथे बुधवारी माढा व बारामती मतदारसंघांतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री बोलत होते.

अकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुकूल धोरणामुळेच उसाची एफआरपीची रक्कम देणे शक्‍य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदी सरकारच्या काळात राज्यातील सिंचनाच्या अनेक प्रलंबित योजना मार्गी लागल्या. युती सरकारने टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या योजनांना निधी दिला. त्यामुळे सांगोला तालुक्‍यातील सुमारे ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली यायला मदत झाली, असेही त्यांनी सांगितले.

अकलूज येथे बुधवारी माढा व बारामती मतदारसंघांतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री बोलत होते. 

फडणवीस म्हणाले की, माण-खटावसाठी वरदायिनी असलेल्या जीएकटापूर योजनेला निधी दिला आहे. मोदींच्या अनुकूल धोरणामुळे उसाची एफआरपीची रक्‍कम देणे शक्‍य झाले आहे, असे सांगून भविष्यात मुळशी धरणाचे पाणी आणि वीजनिर्मितीनंतर समुद्राकडे जाणारे पाणी या भागात वळवून या भागाला मोठा दिलासा देण्याचा आमचा संकल्प आहे.

मोहिते-पाटलांचा जर करायचा असेल मजबूत वाडा, तर राष्ट्रवादीला इथं कायमच गाडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची लक्तरे फाडा आणि म्हणून महायुती जिंकणार आहे बारामती आणि माढा.
- रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्याण मंत्री

पाणी प्रश्‍नावरची ही माढ्यातील शेवटचीच निवडणूक असेल. यापुढे येथे पाणी प्रश्‍नावर निवडणूक होऊ देणार नाही. माढ्यातील जनतेची ही लढाई थेट बारामतीकरांशी आहे.
- रणजितसिंह निंबाळकर, उमेदवार, माढा मतदारसंघ

बारामतीत मी प्रस्थापितांविरुद्ध बंड करीत आहे. या बंडातून इतिहास घडणार आहे. त्याचे तुम्ही साक्षीदार व शिलेदार व्हा.
- कांचन कुल, उमेदवार, बारामती मतदारसंघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi FRP Amount Devendra Fadnavis Politics