Loksabha 2019 : ...तर मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल - कॉंग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 एप्रिल 2019

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी पदावर असताना कोणतीही कामे केली नाहीत, अशी टीका तावडे यांनी केली होती. त्यास सावंत यांनी आज प्रत्युत्तर दिले. विकासकामे केली नसती, तर नांदेड महापालिका निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला भरभरून मते दिली नसती, भाजपने सर्वशक्ती लावूनही नांदेडमध्ये त्यांचे काय झाले.

मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, याचे उत्तर द्यावे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते. त्याबद्दल तर मोदी यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा द्यावी लागेल, असा टोला कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी पदावर असताना कोणतीही कामे केली नाहीत, अशी टीका तावडे यांनी केली होती. त्यास सावंत यांनी आज प्रत्युत्तर दिले. विकासकामे केली नसती, तर नांदेड महापालिका निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला भरभरून मते दिली नसती, भाजपने सर्वशक्ती लावूनही नांदेडमध्ये त्यांचे काय झाले, हे कदाचित तावडेंना आठवत नसेल, असा टोला त्यांनी लगावला.
राज्याच्या मंत्रिमंडळात सोलापूरचे दोन मंत्री भाजपचे आहेत.

महापालिकेवरही भाजपची सत्ता आहे, तरीही शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा का होतो, स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापूरचा काय विकास केला, हेही तावडेंनी सांगावे. सुशीलकुमार शिंदे यांनी काय विकास केला, हे सोलापूरच्या जनतेला माहीत आहे. भाजपसारखी जुमलेबाजी कॉंग्रेसने केलेली नाही. पराभव दिसू लागल्यामुळे भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत; त्यातूनच विरोधकांवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असेही सावंत म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Punishment Congress Politics