Loksabha 2019 : मोदी झळकले ७२२ तास; तर राहुल २५१ तास

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरातील वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त वेळ झळकविल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) अहवालानुसार, पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण ७२२ तास, २५ मिनिटे व ४५ सेकंद दिसले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांपेक्षा एक सभा जास्त घेतली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरातील वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त वेळ झळकविल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) अहवालानुसार, पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण ७२२ तास, २५ मिनिटे व ४५ सेकंद दिसले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांपेक्षा एक सभा जास्त घेतली. मात्र, त्यांना टीव्हीवर मोदींपेक्षा कमी वेळ मिळाला. राहुल यांना वाहिन्यांनी २५१ तास, ३६ मिनिटे, ४३ सेकंद वेळ चमकविले आहे.

पंतप्रधानांनी १ ते २८ एप्रिलदरम्यान देशभर ६४ प्रचार सभा घेतल्या. या चार आठवड्यांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ६५ सभांना संबोधित केले.

देशातील टॉप ११ हिंदी वृत्तवाहिन्यांवर राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती अधिक आहे. मोदींमुळे जास्त टीआरपी मिळतो, या कारणाने त्यांना जास्त वेळ दिला गेला. २५ एप्रिलला वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी मोदींनी केलेल्या रोड शोचे साडेतीस तास थेट प्रक्षेपण केले गेले, तर राहुल गांधींची प्रचारादरम्यान घेतलेली मुलाखत फक्त २५ मिनिटे दाखविण्यात आली. ‘एएनआय’साठी अक्षयकुमारने पंतप्रधान मोदींची मुलाखती घेतली; त्याचेही सर्व वाहिन्यांवर एकाच वेळी प्रक्षेपण करण्यात आले. लंडनमध्ये ‘भारत की बात’मध्ये प्रसून जोशी यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली मुलाखतही दाखविली गेली.

या दोन्ही मुलाखतींना वाहिन्यांवर चांगला प्रेक्षकवर्ग मिळाला. वेळेचा हा मुद्दा अप्रासंगिक आहे. काहींचा अपवाद सोडला, तर सर्वच पक्षनेत्यांना आम्ही समान वेळ देतो, असा वाहिन्यांचा दावा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Rahul Gandhi Channel Likes