Loksabha 2019 : लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई - नरेंद्र मोदी

मनोज गायकवाड
गुरुवार, 18 एप्रिल 2019

विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर
खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली. मात्र, पक्षात प्रवेश केला नाही. खासदार विजयसिंह यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार झाला. विजयसिंहांनी आम्हाला भविष्यात मार्गदर्शन करीत राहावे, अशी अपेक्षा मोदींनी केली व्यक्त.

अकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र दिसत आहे, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत व्यक्त केला.

माढा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची आज अकलूज येथे सभा झाली. या सभेत बोलताना पंतप्रधानांनी महाआघाडीच्या नेत्यांचा आणि काँग्रेसच्या राजकीय कारकिर्दीचा समाचार घेतला. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकांना मजबूत सरकार हवे आहे; मजबूर नव्हे. आघाडी सरकारच्या काळात मुंबई म्हणजे ‘दहशतवाद्यांचा स्वर्ग’ झाली होती तरी देखील, हे सर्वजण गप्प होते. आता हल्ला झाला, तर आम्ही घुसून मारतोय. ही आमच्या नव्या भारताची नीती आहे. जवानांच्या पराक्रमांवर शंका घेणाऱ्यांची नीती आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. देशाच्या सुरक्षेवर घाला घालणाऱ्यांच्या पुढे मी भिंत बनून उभा आहे. गेल्या ५० वर्षांत देशात अनेक गैरव्यवहार झाले, मात्र आमच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत कसलाही भ्रष्टाचाराचा डाग लागू दिलेला नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आम्ही साडेतीन लाख बोगस कंपन्या बंद केल्या. काळा पैसा आणि भ्रष्टाचार यावर थेट कारवाई केली. महागाई नियंत्रणात आणली.

दलालांची साखळी मोडीत काढली. गरिबांना पक्की घरे, मोफत गॅसजोडणी, स्वच्छतागृहे आणि वीजपुरवठ्याला प्राधान्य दिले. गरीब कुटुंबातील व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा दिली. या निवडणुकीनंतर जलशक्ती मंत्रालयाची स्थापन करून देशातील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत नदी जोडप्रकल्पाला प्राधान्य दिले जाणार असून, हे मंत्रालय माढ्यासाठी वरदान ठरेल, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला.

‘शरदरावांनी माढ्याचे मैदान का सोडले?’
शरद पवार हे मोठे खेळाडू आहेत. त्यांना हवेचा अंदाज येत असतो. त्यातूनच ते स्वतःला किंवा स्वतःच्या परिवाराला धोका पोचेल, असा कोणताही निर्णय घेत नाहीत. शरदरावांनी माढ्याचे मैदान का सोडले? हे या सभेला लाभलेली गर्दी पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, असे सांगून मोदी यांनी पवार यांच्यावर टीका केली. पवारांनी माझ्या कुटुंबाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे केले आहेत. मात्र, त्यांना माझ्या कुटुंबाच्या संकल्पनेची कल्पना नाही.

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, वीर सावरकर यांची विशाल कुटुंबाची संकल्पना होती. ही संकल्पनाच माझी प्रेरणा आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Speech Politics Public Trust Income