Loksabha 2019 : साताऱ्याचा राजकीय पारा चढणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

ठाकरेंचा होणार घणाघात?
अंतिम टप्प्यातील प्रचारात सातारा आणि कऱ्हाड हेच लक्ष्य करण्यात आले आहे. कऱ्हाड दक्षिण, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र पाटील चांगली मते घेण्याची दाट शक्‍यता असल्याने तेथे उध्दव ठाकरेंची सभा घेतली आहे. ठाकरेंनी २००९ च्या निवडणुकीत उदयनराजेंवर केलेला घणाघात आजही अनेकांच्या कानात घोंगावत असतो. या सभेत ते कोणता घणाघात करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतांतरे बदलणार; दोन दिवस पवार, ठाकरे, फडणवीस, आंबेडकरांचा झंझावात
सातारा - लोकसभा मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. खुल्या प्रचाराचे अवघे दोन दिवस राहिले असल्याने राजकीय मैदान मारण्यासाठी दिग्गजांची ‘पॉवर’ आजमावली जाणार आहे. त्यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर जिल्ह्यात सभा घेणार असल्याने प्रचाराचा झंझावात निर्माण होणार आहे.

लोकसभेची निवडणूक एकतर्फी होणार, अशी प्रारंभी चिन्हे असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता चुरशीच्या मार्गावर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. याशिवाय, इतर उमेदवारांनी प्रचारात रंगत आणली आहे. प्रथमत: देशपातळीवर चालणारा प्रचार आता मुद्द्यांवरून गुद्यांवर आला आहे. त्यातच राज्य पातळीवरील दिग्गज नेत्यांनी जिल्हाभर प्रचाराचे रान उठविल्याने निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. गल्लीपासून ते वॉर्डापर्यंत कोणी प्रचारात आघाडी घेतली आहे, कोणाला किती मते मिळणार, कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला आघाडी मिळणार, कोण जिंकणार, कोण पराजित होणार, या चर्चा सुरू आहेत. शिवाय, कोण जिंकणार, किती मताधिक्‍य मिळणार, यावर पैजाही झडत आहेत. 

मंगळवारी (ता. २३) मतदान होत असून, आता खुल्या प्रचाराचे अंतिम दोन दिवस राहिले आहेत. त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लावली आहे. मुख्यमंत्री फडणवीस येथील गांधी मैदानावर उद्या (शनिवारी) दुपारी तीनच्या सुमारास सभा घेणार आहेत.

उध्दव ठाकरे कऱ्हाडच्या शिवाजी स्टेडियमवर रविवारी (ता. २१) दुपारी तीन वाजता सभा घेऊन विरोधकांवर शरसंधान करतील. शिवाय, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. सहदेव ऐवळे यांच्या प्रचारार्थ आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हेही रविवारी (ता.२१) कऱ्हाडमधील भाजी मंडईतील जनता व्यासपीठावर सभा घेणार आहेत. दोन दिवसांत होणाऱ्या या दिग्गज नेत्यांच्या सभा मतांतरे बदलणारी, तसेच दिशा बदलणाऱ्या होण्याची शक्‍यता आहे. 

‘मुक्त विद्यापीठ’वर काय?
‘उदयनराजे हे राष्ट्रवादीतून निवडून येऊन खासदार झाले असले, तरी उदयन महाराज हे एक मुक्त विद्यापीठ आहे,’ असे गौरवोद्‌गार २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांनी काढले होते. कोरेगावातील परवाच्या सभेत उदयनराजे विरोधात असल्याने मुख्यमंत्र्यांनी ‘राजा विरुध्द प्रजा’ असे लढाईला स्वरूप दिले आहे. आता शनिवारी याच मुक्‍त विद्यापीठावर ते काय टीका करणार, उदयनराजे सांगत असलेल्या १८ हजार कोटींच्या कामावर काय बोलणार, याकडे राजकीय नजरा लागल्या आहेत. 

‘कॉलर’ आणखी टाइट!
खासदार उदयनराजेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उद्या (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर तोफा धडाडतील. कऱ्हाडच्या सभेत श्री. पवार यांनी उदयनराजेंची ‘कॉलर’ उंचावली होती, आता आणखी कोणाकोणाची ‘कॉलर’ टाइट होईल, ते दिसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Politics Satara Constituency