Loksabha 2019 : पुढचे पंतप्रधान मोदीच - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

ठाकरे म्हणाले...
    देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन दूध पाजणारे सरकार नकोय
    दुष्काळी मराठवाड्यावर केंद्राचा आशीर्वाद असावा
    शेतकऱ्यांना पीकविमा न देणाऱ्या कंपन्यांना मोंदींनी वठणीवर आणावे
    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत विमा कंपन्यांची कार्यालये हवीत
    राज्य सरकार चांगले काम करीत आहे

औसा (जि. लातूर) - पुढचे पंतप्रधान कोण होणार? सांगा... असे शिवसेनेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारताच, जनसमुदायातून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा सुरू झाल्या. पंतप्रधानपदासाठी हे एकच नाव जनतेतून पुढे येत आहे. दुसरे नावच नाही. विरोधकांकडेही पंतप्रधानपदासाठी नाव नाही, असे सांगत मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, यावर त्यांनी जोर दिला. वारंवार कुरापती करणाऱ्या पाकिस्तानावर एकदाच काय तो घाव घातला जावा, अशी अपेक्षा त्यांनी मोदी यांच्याकडे व्यक्त केली.

महायुतीच्या लातूर, उस्मानाबादेतील उमेदवारांच्या प्रचार्थ मंगळवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे हे युतीनंतर प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळी ठाकरे यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान म्हणून शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू हे चालतील काय, असा प्रश्‍न उपस्थित जनसमुदायाला विचारला. त्यानंतर मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे म्हणजे करायचे आहेच. त्यासाठी आपली साथ, आपला आशीर्वाद हवा आहे. संपन्न-सशक्त हिंदुस्थानासाठी तुम्ही मतदान करा, अशा शब्दांत मतदारांना साकडेही घातले.

ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपच्या संकल्पपत्रात शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. खरे तर काँग्रेसच्याच जाहीरनाम्यात थापा आहेत. गरिबी हटाओ, असे ते म्हणत आहेत. ही घोषणा तर तुमच्या आजीबाईंपासून (इंदिरा गांधी) सुरू आहे. तुमची गरिबी हटली; पण जनतेची केव्हा हटणार? पाकिस्तानसमोर आणि दहशतवाद्यांसमोर माना झुकवणारे सरकार आम्हाला नको आहे. पूर्वीचे सरकार तसे होते. पण, आताचे तसे नाही. हे सरकार ठोकून काढण्याची भाषा नुसती बोलून दाखवत नाही, तर ती करूनसुद्धा दाखवत आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Prime Minister Narendra Modi Uddhav Thackeray Politics