Loksabha 2019 : राज्यात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

निवडणूक काळात मी राज्य पिंजून काढले. मला सर्व मतदारसंघांचा कानोसा आला आहे. राज्यातील 48 मतदारसंघांपैकी महाआघाडीला किमान 22-23 जागा मिळणारच आहेत, असा आमचा दावाच आहे.
- जयंत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

सांगली - देशात नरेंद्र मोदी लाट असताना 300 जागा मिळाल्या नव्हत्या. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर "दाल में कुछ काला है,' असे जनता नक्कीच म्हणेल, निकाल जनतेला पटणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या "एक्‍झिट पोल'बाबत व्यक्त केले.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे दुष्काळी भागातील जनावरे-शेळ्या-मेंढ्यांसह मोर्चा काढला. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर विविध वाहिन्यांनी "एक्‍झिट पोल' जाहीर केले. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, 'एक्‍झिट पोलमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीने घाबरून जाऊ नये. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती. सर्वत्र त्यांच्या नावाचा उदोउदो सुरू होता. या वेळी मोदी लाट ओसरली आहे.

त्यांच्या सभांनाही कुठेही ओसंडून गर्दी पहायला मिळाली नाही. तरीही त्यांना लोकसभेत 300 जागा मिळण्याचा अंदाज अशक्‍यच वाटतो. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीला 48 पैकी किमान 22 ते 23 जागा मिळणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर मात्र जनता म्हणते तशी काही तरी गडबड आहे असे म्हणायला वाव आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील स्लिपांची मतमोजणी केली जाणार आहे. आम्हाला वाटते शंभर टक्के स्लिपांची मतमोजणी झालीच पाहिजे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Aghadi Seats NCP Congress Jayant Patil Politics