महाराष्ट्र : महाराष्ट्राची साथ मोदींनाच; काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वप्नभंग!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 मे 2019

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट झाले आहे. गेल्या वेळी भाजपने 23, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या वेळी युतीमध्ये होती. ती जागा जमेस धरता युतीला 42 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार व कॉंग्रेसला दोन अशा आघाडीला केवळ सहा जागा मिळाल्या होत्या.

'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार
पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट झाले आहे. गेल्या वेळी भाजपने 23, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या वेळी युतीमध्ये होती. ती जागा जमेस धरता युतीला 42 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार व कॉंग्रेसला दोन अशा आघाडीला केवळ सहा जागा मिळाल्या होत्या. स्थापनेपासून वीस वर्षांनंतर यंदा प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदारांचा दुहेरी आकडा गाठेल, असे वातावरण तयार झाले असले; तरी तशी शक्‍यता कमी असल्याचे या "एक्‍झिट पोल'मध्ये दिसून आले असून, दोन्ही कॉंग्रेसला प्रत्येकी आठ आणि घटकपक्षांना तीन अशा आघाडीला एकूण 19 जागा मिळतील, असा अंदाज आहे. 

"सकाळ माध्यम समूहा'च्या बातमीदारांनी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघ सामावणाऱ्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानादिवशी केलेल्या पाहणीच्या आधारे हा जनमताचा कौल घेतला. त्याचा महत्त्वाचा निष्कर्ष हा, की राज्यातील बहुतेक सगळ्या मतदारसंघांमध्ये काट्याची लढत होत आहे. अनेक ठिकाणी तर मताधिक्‍य अवघ्या काही हजारांचे असेल. परिणामी, नेमका अंदाज वर्तविणेही अवघड आहे. 

दुसरी बाब म्हणजे कॉंग्रेस नेतृत्वातील आघाडीत सहभागी होण्याबाबत खूप चर्वितचर्वण झाल्यानंतरही ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडेल व त्या फाटाफुटीचा लाभ भाजप-शिवसेना युतीला होईल, असा अंदाज होता. "सकाळ'च्या पाहणीतही त्याचे प्रतिबिंब उमटले. 

महाराष्ट्रात 11 ते 29 एप्रिलदरम्यान चार टप्प्यांमध्ये मतदान झाले. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रातील दहा; तिसऱ्या टप्प्यात खानदेश, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील मिळून चौदा आणि चौथ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे मिळून सतरा जागांसाठी मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात केवळ नऊ प्रचार सभा घेतल्या. त्यांची गर्दीच्या मुद्द्यावर वर्धा येथील पहिली, तसेच सैन्यदलातील जवानांसाठी मते मागितल्याच्या मुद्द्यावर लातूर आणि मोहिते पाटील व विखे पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर अनुक्रमे माढा व नगर येथील सभाही चर्चेत राहिल्या.

मुंबईतल्या त्यांच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. या तुलनेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीचा प्रचार मुख्यत्वे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोडून दिला होता. वर्धा, नांदेड, संगमनेर अशा मोजक्‍या सभांशिवाय त्यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Maharashtra Exit Poll Narendra Modi Congress NCP Politics