Loksabha 2019 : एकतर्फी ते चुरशीची लढत

राजेश सोळसकर
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रश्‍न

  • मोठ्या उद्योगांचा अभाव
  • तरुणांमधील बेरोजगारी
  • रखडलेले जलसंधारण प्रकल्प
  • वैद्यकीय महाविद्यालय रखडले
  • कऱ्हाड-चिपळूण लोहमार्ग प्रलंबित

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि उदयनराजे भोसले यांच्यासारखा तगडा उमेदवार सातारा मतदारसंघात असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी युतीने आपली सारी ताकद पणाला लावली आहे. दोन्हीही उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

सुरवातीच्या काळात अगदी एकतर्फी वाटत असलेल्या सातारा मतदारसंघातील निवडणुकीला अखेरच्या टप्प्यात चुरशीचे स्वरूप आले आहे.

उदयनराजे भोसले यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या बलाढ्य उमेदवाराशी लढत देण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील कंबर कसून मैदानात उतरले आहेत. शिवसेनेबरोबरच गेल्या पाच वर्षांत भाजपने वाढविलेली ताकद पाटील यांच्या पथ्यावर पडत आहे, असे सध्याचे प्रचारचित्र आहे. विशेषतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यातील लढत प्रतिष्ठेची बनवली असून, भाजपची सारी ताकद त्यांनी पाटील यांच्यासाठी पणाला लावली आहे.

असे असले तरी राष्ट्रवादीचे या मतदारसंघात असलेले प्राबल्य नाकारता येत नाही. राष्ट्रवादीचे चार आमदार मतदारसंघात आहेत. उदयनराजेंसारखा वलय असलेला उमेदवार समोर आहे. अगदी गावपातळीवरही हा पक्ष रुजलेला आहे. या साऱ्या स्थितीचे आव्हान युती कसे पेलणार, हे पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सध्या दोन्हीही उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवली आहे. राष्ट्रवादीकडून आजपर्यंत केलेल्या विकासकामांचे दाखले देण्यात येत आहेत, तर युतीकडून जिल्ह्यामधील दहशतीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. उदयनराजे यांनी सारा मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांच्याविषयी आधी नाराज असलेले त्यांचे चुलतबंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सर्व आमदार त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. नरेंद्र पाटील यांनीही आपला प्रचार अगदी गावपातळीवर पोचवलाय. आमदार शंभुराज देसाई त्यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. याशिवाय, नुकतेच भाजपवासी झालेले माजी आमदार मदन भोसले हेही प्रचारात सक्रिय झाल्याने पाटील यांची ताकद वाढली आहे.

या लढतीचे स्वरूप काही प्रमाणात ‘पवार विरुद्ध मोदी’ असेही झाले असल्याचे दिसते. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात जसा आहे; तसाच गेल्या पाच वर्षांत मोदी यांना मानणाराही वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय. म्हणूनच, या ‘व्यक्तिपूजक’ मतांचा फॅक्‍टरही या निवडणुकीत येथे चालणार आहे.

याशिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रतिबिंबही या निवडणुकीत उमटताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा शिवसेना-भाजप, या सर्वच पक्षांतील विधानसभा इच्छुकांना आपापल्या उमेदवारांसाठी झटून काम करावे लागत आहे. म्हणजेच, लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांसोबत आगामी विधानसभा इच्छुकांचे भवितव्यही या निवडणुकीत मतदार ठरविणार आहेत. ही निवडणूक चुरशीची होण्यामागे हेही एक कारण आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Satara Udayanraje Bhosale Narendra Patil Politics