Loksabha 2019 : उद्धव, तुम्ही एकदा तरी मैदानात या - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

सांभाळून बोला...
‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे. बारामतीत येऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पवार यांच्याविषयी बेताल वक्तव्य करतात. जीभ सांभाळून बोला. मी जरी काँग्रेसमध्ये गेलो असलो, तरी संभाजी ब्रिगेडचा मी अध्यक्ष आहे, हे विसरू नका, असा सज्जड इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला.

मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर टेकविल्याशिवाय राहणार नाही.’’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाकरे यांच्या ‘पवारांनी मैदान सोडले’ या टीकेला सडेतोड उत्तर दिले. मंचर (ता. आंबेगाव) येथे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. 

दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शहा, प्रदीप गारटकर, सत्यशील शेरकर, अतुल बेनके, विवेक वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर यांच्यासह जनसमुदाय  उपस्थित होता. 

पवार म्हणाले, ‘‘खेड तालुक्‍यातील विमानतळाबाबत मी शिवाजीरावांना बोलावून घेतले. विरोध करू नका असे सांगितले. 

मला ते हो म्हणाले. उद्योजक बाबा कल्याणी यांच्याबरोबरही जागेबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन योग्य मोबदला द्यावा, असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. पण अधिकारी जेव्हा सर्वेला गेले, तेव्हा पुन्हा खासदारांनी विरोध केला. विमानतळ झाले असते तर शेतीमाल परदेशात गेला असता. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांना निवडून द्या. या मतदारसंघातील प्रश्‍न सोडविण्यासाठी मी व वळसे पाटील डॉ. कोल्हे यांच्या पाठीमागे ताकदीने उभे  राहू.’’

वळसे पाटील म्हणाले, ‘‘तांबडेमळा- मंचर येथे मंजूर केलेल्या एसटी आगाराचे काम २०१६ मध्ये पूर्ण झाले; पण अजून खासदारांना एकही एसटी आगारातून सोडता आली नाही. त्यांनी रेल्वे सुरू करण्याच्या गप्पा मारू नयेत. ’’ 

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांसह १४ मंत्र्यांच्या सभा शेतकऱ्याच्या मुलाला घेरण्यासाठी येतात. १५ वर्षे व्यवस्थित काम केले असते तर खासदारांवर हे दिवस आले नसते. कितीही सभा घ्या. जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याने माझा विजय निश्‍चित आहे. उत्सुकता मताधिक्‍याचीच आहे.’’

लाव रे तो व्हिडिओ...
लाव रे तो व्हिडिओ, असे म्हणत देवदत्त निकम यांनी देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे, तसेच आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर केलेल्या टोकाच्या टीकेचे व्हिडिओ दाखविल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रवीण गायकवाड, दिलीप मोहिते, संजय जगताप, मंगलदास बांदल, संजय काळे यांचीही भाषणे झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Sharad Pawar Speech Uddhav Thackeray Amol Kolhe Politics