Loksabha 2019 : विदर्भात शेती, तर प. महाराष्ट्रात ‘गटबाजी’

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

दोन गटांतील संघर्ष 
माढा लोकसभेत संजय शिंदे विरुद्ध मोहिते असा गटबाजीचा संघर्ष आहे. तर, कोल्हापुरात धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील असे आघाडीत दोन तट पडले आहेत. सांगलीमध्ये काँग्रेसने पहिल्यांदाच जागा सोडली. पण, गटबाजीच्या राजकारणाच्या धास्तीने वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातच उमेदवारी देण्यात आली. अहमदनगरमध्ये तर विरोधी पक्षनेते भाजपच्या प्रचारात गुंतले असून, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे असा कलगीतुरा सुरू आहे.

मुंबई - ग्रामीण भागातील मतदार सरकारच्या विरोधात नाराज असल्याचा दावा केला जात असला, तरी महाराष्ट्रात मात्र कोरडवाहू व बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मतभेदाचे राजकारण सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा या भागांतील मतदारांमध्ये शेती व शेतकरी हा कळीचा मुद्दा आहे, तर पश्‍चिम महाराष्ट्रातल्या समृद्ध शेतकऱ्यांना गटबाजीच्या राजकारणात अधिक रस असल्याचे दिसते.

विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू आहेत. सततच्या दुष्काळाने हा शेतकरी पिचला असून, तो कोरडवाहू शेतीच्या समस्यांवर सरकारने ठोस उपाययोजना केली नसल्याची खंत व्यक्‍त करीत आहे. याचे पडसाद मतदानात उमटतील, असे जाणकारांना वाटते. मात्र, या उलट शेतीचा सर्वाधिक विकास झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातला शेतकरी मात्र गटातटाच्या राजकारणालाच प्राधान्य देत असल्याचे दिसते.  मराठवाडा व विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या कोरडवाहू पिकांचे उत्पादन व हमीभाव हे प्रचारात कळीचे मुद्दे ठरत आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा सर्वाधिक ऊस उत्पादक आहे. त्यामुळे सहकार, साखर कारखानदारी, दूध उत्पादक संस्था, पतसंस्था व शेतीपूरक उद्योग यांसारख्या आर्थिक क्षेत्रांत गुंतलेला आहे. या विभागातले राजकारणच ऊस उत्पादक व सहकारी संस्थाशी निगडित असल्याने इथे सत्तेचे पाठबळ महत्त्वाचे मानले जाते. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यांत बंडखोर नेत्यांची संख्या वाढली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Vidarbha Agriculture Western Maharashtra Grouping Politics