Loksabha 2019 : राजनाथसिंहांनी विनोद तावडेंना गाडीत बसण्याची संधी द्यावी - मनसे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 एप्रिल 2019

हरिसालमधील परिस्थिती राज यांनी नांदेडमधील सभेतून मांडल्यानंतर तावडे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना गावातील सर्व सुविधा योग्य प्रकारे सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, आता "मनसे विरुद्ध तावडे' असा वाद रंगला आहे.

मुंबई - राज ठाकरे यांनी प्रचार सभा सुरू केल्यापासून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली आहे. देशातील पहिले डिजिटल गाव असणाऱ्या हरिसालमधील सध्याच्या परिस्थितीवरून मनसे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. "तावडे यांना एकदा तरी तुमच्या गाडीत बसायची संधी द्या,' अशी विनंती करणारे पत्र मनसेने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना पाठवून तावडे यांना टोला लगावला आहे.

हरिसालमधील परिस्थिती राज यांनी नांदेडमधील सभेतून मांडल्यानंतर तावडे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना गावातील सर्व सुविधा योग्य प्रकारे सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, आता "मनसे विरुद्ध तावडे' असा वाद रंगला आहे.

"तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या,' अशी विनंती करणारे पत्र मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी राजनाथसिंह यांना पाठविले आहे. काळे यांनीच ट्‌विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

काळे यांनी पत्रात म्हटले आहे, "राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आपण महाराष्ट्राच्या विधानभवनात आला होता. तेथून परत निघताना तुमच्यासोबत गाडीत बसण्यास तावडे यांनी प्रयत्न केला असता आपल्या सुरक्षारक्षकाने त्यांना गाडीत बसण्यास रोखल्यापासून तावडे यांच्या डोक्‍यावर परिणाम झाला आहे. त्यांना त्वरित मानसोपचाराची गरज आहे. पक्षात कोणी गंभीरपणे घेत नसल्याने राजसाहेबांवर आरोप करून आपण चर्चेत तरी राहू, असा "विनोदी' विचार करून तावडे सध्या बेताल बडबड करीत आहेत. मात्र, आता हे सारे त्यांच्या अंगलट येऊ लागले आहे. तरी कृपया, आपण महाराष्ट्रात येऊन एकदा या विनोदी तावडेंना आपल्या गाडीत बसू द्यावे. जेणेकरून त्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गाडीत बसण्याची इच्छा पूर्ण होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Vinod Tawde rajnath singh MNS Politics