Loksabha 2019 : मतदान केंद्रांवर होणार ‘मॉक पोल’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

‘मॉक पोल’मध्ये हे पाहिले जाणार 

  • ईव्हीएम मशिन नीट चालते आहे का नाही. 
  • मतदान केल्यावर बीप वाजते का नाही.
  • ‘व्हीव्हीपॅट’मध्ये चिठ्ठ्या पडतात की नाही.
  • मशिन अचूकपणे काम करीत आहे का नाही. 

पुणे - ईव्हीएम मशिनबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी सकाळी एक तास आधी सर्व मतदान केंद्रांवर ‘मॉक पोल’ (मतदान चाचणी) घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ही चाचणी होणार असून, ईव्हीएम मशिनमध्ये कमीत कमी ५० मते टाकून पडताळणी केली जाणार आहे.

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर हे ‘मॉक पोल’ होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीपासून ‘ईव्हीएम’बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा मुद्दा न्यायालयातसुद्धा गेला आहे. ‘ईव्हीएम’च्या सत्यतेविषयी विरोधकांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने ‘मॉक पोल’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीमध्ये ‘ईव्हीएम’सोबत व्हीव्हीपॅट मशिन जोडले जाणार आहे. त्यामुळे मतदाराला आपण दिलेले मत ‘व्हीव्हीपॅट’मध्ये प्रिंट स्वरूपात सात सेकंद दिसणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर मतदान सुरू होण्याच्या एक तास आधी ‘ईव्हीएम’मध्ये ‘मॉक पोल’ घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने याबाबतचे प्रशिक्षण मतदान केंद्राध्यक्षांना दिले आहे. 

मतदानाच्या दिवशी एक तास आधी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर ‘ईव्हीएम’मध्ये कमीत कमी ५० मते टाकून ही चाचणी घेतली जाणार आहे. सर्व उमेदवारांच्या चिन्हाबरोबरच ‘नोटा’समोरील बटन दाबून मत नोंदविले जाणार आहे. त्यानंतर ‘व्हीव्हीपॅट’मध्ये चिठ्ठ्या आहेत का, याची ही तपासणी केली जाणार आहे. हे सर्व बरोबर असेल, तर या चिठ्ठ्या ‘व्हीव्हीपॅट’मधून 
काढून लिफाफ्यात सीलबंद केल्या जाणार आहेत. त्यावर सर्व प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रतिनिधींसमोर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन सीलबंद केले जाणार आहेत. 

ही प्रक्रिया सकाळी सातच्या आधी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

पुणे व जिल्ह्यात मिळून एकूण ७ हजार ९०३ मतदान केंद्रे.
प्रत्येक मतदान केंद्रावर एक हजार ते बाराशे मतदान.
एका यंत्रणावर मतदान घेण्याची क्षमता १५००.

Web Title: Loksabha Election 2019 Voting Center Mock Poll EVM Machine