Loksabha 2019 : युतीला घाबरून विरोधक पळाले - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

अमरावती - हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली भाजप-शिवसेनेची युती भविष्यातही अभेद्य राहील. युती झाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी पडले असून, विरोधकांनी रिंगणातून माघार घेणे सुरू केले आहे. ही युती सत्तेसाठी नसून हिंदुत्व व राष्ट्रीयत्वासाठी आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे झालेल्या युतीच्या महामेळाव्यात दिले.

संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात शिवसेना-भाजप युतीचा पहिला विभागीय मेळावा शुक्रवारी पार पडला. मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पश्‍चिम विदर्भातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आमदार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की भाजप-शिवसेनेची युती होऊ नये, यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडविले होते. मात्र, त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले गेले. विरोधी पक्षांतील अनेकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. काही पक्षांचे तर कॅप्टनच रिंगणातून बाहेर पडले. आता ही युती अभेद्य राहणार असल्याची ग्वाही देत त्यांना विधानसभाही युतीने लढणार असल्याचे संकेत दिले. गेल्या पाच वर्षांत राबविलेल्या योजना व नागरिकांना मिळालेला लाभ यावरही त्यांनी भाषणात जोर दिला. राज्यात नवीन रेकॉर्ड करायचा असल्याचे सांगत सर्व ४८ जागांवर युतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनीही युती का झाली, याचे स्पष्टीकरण देत युती झाली नसती तर कुणाचे फावले असते, असा सवाल करून कार्यकर्त्यांना संघर्षाचा नारा दिला. 

पवारांना प्रवेश देऊ नका
युतीमुळे विरोधक थंडगार झाले आहेत. त्यांनी सुरक्षित घर शोधणे सुरू केल्याची टीका करतानाच मुख्यमंत्र्यांनी पवारांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, असा सल्ला ठाकरे यांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Yuti Opposition Party Devendra Fadnavis Politics