महाराष्ट्र : राज्यात युतीचाच झेंडा! काँग्रेस-राष्ट्रवादी भुईसपाट!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 मे 2019

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ. अमोल कोल्हे आणि सुनील तटकरे यांच्या विजयाने "राष्ट्रवादी'मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ. अमोल कोल्हे आणि सुनील तटकरे यांच्या विजयाने "राष्ट्रवादी'मध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा धक्‍कादायक पराभव झाला असून, वंचित बहुजन आघाडीचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसल्याचे स्पष्ट झाले. कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा धक्‍का बसला आहे.

भाजप-शिवसेना युतीने गेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे गणित या वेळीही साधले असून, सुमारे 40 पेक्षा जास्त जागा जिंकत विजयाचा झेंडा रोवला, तर कॉंग्रेसची धूळधाण झाली असून, कॉंग्रेसचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एक जागा अधिक जिंकली आहे. मात्र, पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव झाल्याचा धक्काही "राष्ट्रवादी'ला बसला आहे.

राज्यात लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपने 23, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत. लोकसभेची निवडणूक युतीने लढवण्यासाठी भाजपने नमते घेत शिवसेनेबरोबर युती केली. राज्यात आणि केंद्रात मागील पाच वर्षे सत्तेत सहभागी होऊनही शिवसेनेने सातत्याने भाजपवर टीकेची झोड उठवली होती. भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनने एकदम "यू टर्न' घेत भाजपबरोबर युती केली. याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या सर्व भागांत युतीला घवघवीत यश मिळाले.

शिवसेनेने पालघरची जागा भाजपकडून जागावाटपात घेतली. या ठिकाणी पोटनिवडणुकीत भाजपकडून जिंकलेले राजेंद्र गावित यांना शिवसेनेची उमेदवारी दिली. गावित विजयी झाले. शिवसेनेने विद्यमान खासदारांनाच संधी दिली, तर भाजपने चार-पाच उमेदवार बदलले. नगर, दिंडोरी, माढा या ठिकाणी इतर पक्षांतून आयारामांना संधी दिली.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सुजय विखे, दिंडोरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्या भारती पवार, तर माढ्यात कॉंग्रेसमधून आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपकडून निवडून आले आहेत.

माढा आणि बारामती या जागा भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याचा चंग बांधला होता. मात्र, भाजपला यात अपयश आले असून, सुळे दीड लाखाच्यावर मताधिक्‍यांनी निवडून आल्या आहेत, तर माढ्यात "राष्ट्रवादी'चे संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला आहे.

मुंबईतील सहा जागासह कोकणात युतीने जोरदार मुसंडी मारली आहे. रायगडवगळता सर्वच जागा युतीने राखल्या आहेत. कोकणात नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांचा पराभव झाला आहे.

- शिरूर, अमरावती, रायगड, औरंगाबादमध्ये शिवसेना पराभूत
- त्या बदल्यात पालघर, कोल्हापूर, हातकणंगले, हिंगोली या नव्या जागांवर विजय
- शिवसेनेचे दिग्गज केंद्रीय मंत्री अनंत गिते, शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ पराभूत
- भाजपने चंद्रपूर गमावले; पण माढा कमावले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results Yuti Win Shivsena BJP Congress NCP Politics