Election Results : राज ठाकरेंचा प्रभाव शून्यच; महाराष्ट्रात भाजप-सेना जोरात!

गुरुवार, 23 मे 2019

राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते. मात्र, त्याचे रुपांतर मतांमध्ये होत नसल्याचे बोलले जात होते. लोकसभा निवडणूकीदरम्यान झालेल्या सभांवरूनही हे खरे ठरत आहे.

पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही.

राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केले होते. सभेदरम्यान त्यांनी अनेक पुरावे सादर केले. ठाकरे यांच्या 'ए लावरे तो व्हिडिओ'ही धुमाकुळ घातला होता. लोकसभा निवडणूकीदरम्यान सर्वाधिक चर्चा राज ठाकरे यांच्या सभांची झाली.

राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी तर इतर नेत्यांच्या प्रचार सभांना तुरळक गर्दी दिसत होती. राज ठाकरे यांच्या सभांचा मतदानावर मोठा परिणाम होऊन भाजपला फटका बसणार असे भाकित वर्तवले जात होते. मात्र, आज (बुधवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीनुसार भाजपचे नेते आघाडीवर दिसत आहेत. यामुळे राज ठाकरे फॅक्टर महाराष्ट्रात चालल्याचे सध्या तरी दिसत नाही.

राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते. मात्र, त्याचे रुपांतर मतांमध्ये होत नसल्याचे बोलले जात होते. लोकसभा निवडणूकीदरम्यान झालेल्या सभांवरूनही हे खरे ठरत आहे. ठाकरे यांच्या दहा ठिकाणी झालेल्या सभांवरून भाजपला मोठा दणका बसणार हे बोलले जात होते. मात्र, फटका बसण्याऐवजी भाजप नेत्यांनी आघाडी घेतली आहे.

राज्यात राज ठाकरे यांच्या झालेल्या सभा पुढीलप्रमाणेः

  • 12 एप्रिल : नांदेड
  • 15 एप्रिल : सोलापूर
  • 16 एप्रिल : कोल्हापूर
  • 17 एप्रिल : सातारा
  • 18 एप्रिल : पुणे
  • 19 एप्रिल : महाड, रायगड
  • 23 एप्रिल : काळचौकी, मुंबई
  • 24 एप्रिल : भांडुप (पश्चिम), मुंबई
  • 25 एप्रिल : कामोठे, पनवेल
  • 26 एप्रिल : नाशिक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns raj thackeray factor nothing in loksabha 2019 at maharashtra