अंदाजपंचे : शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित

बुधवार, 8 मे 2019

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

उत्तर पूर्व मुंबईत मनोज कोटक मारणार बाजी
उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. सुरवातीच्या टप्प्यात मागे पडलेले मनोज कोटक यांनी मात्र शेवटच्या टप्प्यात बाजी मारली असून उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून आपला विजय निश्चित केला आहे.

दक्षिण मध्य मुंबईत शेवाळेंची बाजी
दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, सेनेचे राहुल शेवाळे यांचा सामना अनुभवी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध होत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. आता मात्र, यांच्यात जोरदार चुरस असली तरी शेवाळेच बाजी मारणार असल्याचे दिसत आहे. विद्यमान खासदार शेवाळेंना शिवसेनेचे पाठबळ असल्याने शेवाळे खासदारकी राखणार हे जवळपास निश्चित आहे.

उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्तचा दावा मजबूत
प्रमोद महाजन यांचा वारसा असलेल्या पूनम महाजन आणि सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चुरस आहे. भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या पूनम यांच्यापुढे दोनवेळा खासदार राहिलेल्या प्रिया दत्त यांचे कडवे आव्हान आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांचाच पराभव करून पूनम महाजन खासदार झाल्या होत्या. यंदा प्रिया दत्त यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. पण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या लढण्यास तयार झाल्या. प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी संजय दत्त यांनीही रोड शो घेतला होता. एकूणच, प्रचाराचा रोख पाहता उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Shevale, Priya datta, manoj Kotak likely to win Loksabha 2019